मुंबई, 25 मार्च : बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढते आहे. हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी डाएट व विविध उत्पादनांचा शरीरावर भडिमार केला जातो. यापैकीच एक म्हणजे ग्रीन टी. साधा चहा पित्तकारक असल्यानं त्याला पर्याय म्हणूनही अनेक जण ग्रीन टी किंवा हर्बल टीचा वापर करतात; पण त्यामुळे खरोखरच वजन कमी होतं का याचा विचार होणं गरजेचं आहे.
अनेक जण ग्रीन टी लठ्ठपणा कमी करण्यासाठी पितात. गरम पाणी, त्यात आलं, मध, लिंबू, विविध मसाले किंवा फळं या विविध चवींचा ग्रीन टी प्यायल्यास ताजंतवानं वाटतं. हा चहा नेहमीच्या चहापेक्षा निश्चितच अधिक आरोग्यदायी असतो; पण लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. “रोज 2 कप ग्रीन टी पिऊन वजन कमी होईल असे कोणतेही घटक या चहामध्ये नसतात. ग्रीन टी किंवा वेटलॉस टी या केवळ मार्केटिंगच्या क्लृप्त्या असतात,” असं ‘मितेन सेज फिटनेस’चे संस्थापक आणि फिटनेस कोच मितेन काकैया यांचं म्हणणं आहे.
Brown Sugar Benefits : पांढऱ्या साखरेपेक्षा खरंच फायदेशीर असते का ब्राऊन शुगर?
ग्रीन टीमधल्या थर्मोजेनिक इफेक्टमुळे त्याचा वजन कमी करण्याशी संबंध जोडला जातो. काही खाद्यपदार्थांमुळे शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होतात. अशा अन्नघटकांमधल्या थर्मोजेनिक इफेक्टमुळे वेटलॉसला चालना मिळते; मात्र हा वेटलॉस मर्यादित असतो. दिवसाला केवळ एक ते दोन कप ग्रीन टी मोठ्या प्रमाणावर वेटलॉस साधू शकत नाही.
ग्रीन टीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आतड्याचं कार्य सुधारतं व रोगप्रतिकारशक्ती वाढते; मात्र परिणामकारक वेटलॉस होण्यासाठी चहाची मात्रा जास्त असणं गरजेचं असतं.
“फक्त ग्रीन टी पिऊन भरपूर वजन कमी होईल असं अनेकांना वाटतं; मात्र ते खरं नसून ग्रीन टीमुळे केवळ आपली भूक थोडी कमी होते,” असं Hell-Beant फिटनेस स्टुडिओचे फिटनेस कोच Md. Abid Hossian यांचं मत आहे.
वेटलॉसचे उपाय
वेटलॉस दोन पद्धतींनी करता येऊ शकतो. आहारातून कमी कॅलरीज घेऊन व जास्तीत जास्त ऊर्जा खर्च करून अशा दोन पद्धतींनी वेटलॉस करता येतो. हा बदल एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी जीवनशैलीत काही बदल करून सातत्यानं त्याचा अवलंब करावा लागतो.
कॅलरीत घट : दिवसभरात तुम्ही जितकी ऊर्जा खर्च करता त्याला टोटल डेली एनर्जी एक्स्पेंडिचर (TDEE) असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरात तुम्ही अमुक इतक्या कॅलरीज खर्च करता. तुम्हाला वेटलॉस करायचा असेल, तर तुम्ही जितक्या कॅलरीज दिवसभरात आहारातून घेता, त्यापेक्षा खर्च होणारी ऊर्जा म्हणजेच कॅलरीज जास्त असल्या पाहिजेत. हा फरक तुमचं वजन कमी करण्यासाठी दिशादर्शक ठरेल. एक तर व्यायाम जास्त करून किंवा आहारातल्या कॅलरीज कमी करून अशा दोन पद्धतीनं तुम्ही हे करू शकता.
तुमच्या फ्रीज मध्ये 18 लाखांहून अधिक बॅक्टेरिया; संसर्ग झाला तर...
सक्रिय जीवनशैली : स्वतःला व्यायामाची सवय लावून घेणं हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी चांगलं असतं. रोजचं वर्कआउट, योगासनं, पायलेट्स, नृत्य, धावणं या काही गोष्टींमधून तुम्ही दिवसभर स्वतःला क्रियाशील ठेवू शकता.
समतोल आहार : आहारातून कॅलरीज कमी घेणं याचा अर्थ पौष्टिक अन्न न घेणं असं नाही. शरीराचं पोषण करण्यासाठी पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक आहारात असले पाहिजेत.
केवळ ग्रीन टी किंवा वेटलॉस टीमुळे लठ्ठपणा कमी होऊ शकत नाही. बदल घडवण्यासाठी आहार, जीवनशैली व तुमच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. त्या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तीकडून तुम्ही वेटलॉसची अधिक माहिती घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips