मुंबई, 25 मार्च : गेल्या काही वर्षांत आपल्या स्वयंपाकघरात मोठा बदल झाला आहे. पूर्वी स्वयंपाकासाठी, अन्नधान्य, भाजीपाला साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. विविध धातूंची भांडी, इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर किचनमध्ये वाढला आहे. रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज हा त्यापैकीच एक होय. उन्हाळ्यात तुलनेने फ्रीजचा वापर जास्त केला जातो. अन्नपदार्थ, फळं, अंडी, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आदी गोष्टी खराब होऊ नयेत, त्यातला ताजेपणा टिकून राहावा यासाठी त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. या गोष्टी साठवण्यासाठी फ्रीज खरोखरच सुरक्षित आहे का? फ्रीजमध्ये 18 लाखांहून अधिक जिवाणू लपलेले असू शकतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. हे बॅक्टेरिया अर्थात जिवाणूंमुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. श्वसनासंबंधी विकार, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं किंवा गर्भवती महिलांचा गर्भपातही होऊ शकतो. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
आता उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात फ्रीजचा जास्त वापर होतो. थंड पाणी मिळण्याव्यतिरिक्त फळं, भाजीपाला, अन्नपदार्थ खराब होऊ नये, यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवले जातात; मात्र फ्रीजमध्ये आरोग्यास धोकादायक ठरणारे 18 लाखांहून अधिक बॅक्टेरिया लपलेले असू शकतात. या संदर्भात 2019मध्ये एक संशोधन करण्यात आलं. त्यात शास्त्रज्ञांनी 10 वेगवेगळ्या फ्रीजमधल्या विविध जागांवरून पाच नमुने गोळा केले. 50पैकी 19 नमुन्यांमध्ये एरोमोनास बॅक्टेरिया, इंटरोबॅक्टर क्लोके आणि क्लेबसिला ऑक्सिटोसा हे बॅक्टेरिया आढळून आले. एरोमोनास बॅक्टेरियाचा संबंध गॅस्ट्रोइंटेस्टिनल संसर्गाशी असतो. त्यामुळे जुलाबावाटे रक्त पडणं किंवा डायरिया होतो. एन्टरोबॅक्टर क्लोकेमुळे हाडं आणि हृदयाला संसर्ग होऊ शकतो. क्लेबसिला ऑक्सिटोसामुळे सेप्टिक शॉक होऊ शकतो.
लिस्टेरिया हा पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. गर्भवती महिला, लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती या जिवाणूला बळी पडतात. लिस्टेरिया बॅक्टेरिया महिलांचा गर्भपात, अर्भकाचा मृत्यू किंवा अन्य गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतो. याचा संसर्ग झाला तर ताप, मान आखडणं, अशक्तपणा आणि उलट्या होणं ही लक्षणं दिसतात. कधीकधी डायरियादेखील होतो. रुग्णाच्या प्रकृतीनुसार हा संसर्ग काही दिवस किंवा आठवड्यांपर्यंत राहतो. हा घातक जिवाणू फ्रीजमध्ये सापडतो. फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ ठेवले जातात, तिथं हा जिवाणू वाढतो.
फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्याचं ठिकाण आणि मीट ड्रॉवर सर्वांत अस्वच्छ असतात. याशिवाय ज्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ ठेवले जातात, ती जागादेखील अस्वच्छ असते. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक जिवाणू असू शकतात. न धुतलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि पदार्थ एकमेकांच्या संपर्कात येऊन खराब झाल्याने जिवाणू वाढतात. त्यामुळे फ्रीजमध्ये खाण्याचे पदार्थ झाकून ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हे जिवाणू कमी तापमानात वाढू शकतात. जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी उरलेलं अन्न हवाबंद कंटेनरमध्ये आणि वरच्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये साठवावं, असं यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर अर्थात यूएसडीएने सांगितलं आहे.
अंडी फ्रीजच्या आत ड्रॉवरमध्ये ठेवण्याऐवजी कार्टन किंवा शेल्फमध्ये ठेवावीत, असं एजन्सीने सांगितलं आहे. फ्रीजच्या कंटेनरमध्ये जिवाणू जास्त प्रमाणात असतात, हे जिवाणू रोगांचं प्रमुख कारण बनतात, असं पूर्वीच्या संशोधनात आढळून आलं आहे. फ्रीजची सरासरी लांबी 62 इंच आणि उंची 29 इंच असते. पॅथोजेनिक बॅक्टेरिया 40 ते 140 अंश फॅरेनहाइट तापमानादरम्यान वाढतात. या जिवाणूंमुळे अन्नजन्य रोग होतात; पण सहसा त्याचा परिणाम अन्नाची चव आणि वासावर होत नाही. फ्रीजमधली जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी स्वच्छता ठेवणं, फळं आणि भाज्या स्वच्छ धुऊन घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle