मुंबई, 6 एप्रिल- लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं; पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या आकडेवारीतून याचा प्रत्यय येतोय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथल्या कौटुंबिक न्यायालयात दररोज घटस्फोटासाठी 50 अर्ज येत आहेत. यापैकी 30 टक्के प्रकरणं अशी आहेत, ज्यात विवाहबाह्य संबंध किंवा बेस्ट फ्रेंडमुळे पती-पत्नीमधील अंतर वाढतंय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलंय. लखनौ कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची प्रकरणं हाताळणाऱ्या वकिलांच्या मते, न्यायालयात येणाऱ्या घटस्फोटांच्या अनेक प्रकरणांमध्ये चांगले मित्र समेट करण्याऐवजी घटस्फोटासाठी प्रवृत्त करतात. गेल्या एका महिन्यात लखनौ कौटुंबिक न्यायालयात अशी आठ प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात एखाद्या पुरुषाने घटस्फोट घ्यावा यासाठी त्याची मैत्रीण अधिक उत्सुकता दाखवत होती. घटस्फोट घेणाऱ्या पती-पत्नीपेक्षा त्यांचे बेस्ट फ्रेंड्स अशा खटल्याच्या निर्णयाबाबत अधिक उत्सुक असल्याचं चित्र आहे. ते वकिलांकडून नियमित अपडेट घेतात. याशिवाय लव्ह मॅरेज करणाऱ्यांचं घटस्फोट घेण्याचं प्रमाणही वाढत आहे. कौटुंबिक न्यायालयात दररोज येणाऱ्या 50पैकी सुमारे 30 प्रकरणांमध्ये पती-पत्नीचं लव्ह मॅरेज असतं. घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या महिला आणि पुरुषांचं प्रमाण 50-50 टक्के आहे. 5 ते 6 टक्के प्रकरणांमध्ये परस्परसंमतीने घटस्फोट होत आहेत. 70 टक्के पुरुषांना घटस्फोटानंतर मुलं त्यांच्यासोबतहवी आहेत. 99 टक्के स्त्रिया घटस्फोटासोबत पोटगीसाठी अर्ज करतात. 44 टक्के पुरुष त्यांच्या पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी अर्ज करतात. (हे वाचा: विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांना योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे ) कौटुंबिक न्यायालयातल्या वकील दिव्या मिश्रा व फॅमिली बार असोसिएशनचे अध्यक्ष पदम कीर्ती यांच्या मते, ‘केवळ दयाशंकर सिंह आणि स्वाती सिंहच नाही, तर अनेक दिग्गज व्यक्तीचे घटस्फोट होत आहेत. त्यात समाजवादी पार्टीच्या महिला नेत्याही आहेत, ज्या लखनऊ कॅंटमधून तिकिटासाठी दावा करत होत्या. भाजप खासदार संघमित्रा यांचंही प्रकरण नुकतंच समोर आलंय. अभिनेता प्रतीक बब्बर, लखनौमधील माजी जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांचाही घटस्फोट झालाय. एका वॉटर पार्कच्या मालकाचं प्रकरणही प्रलंबित आहे. दिव्या मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोविडनंतर न्यायालय सुरू झाल्यावर घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एक वेळ अशी होती की, न्यायालयात अशा दररोज 60 केसेस येत होत्या. लॉकडाउनमध्ये अनेकांचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आणि ते घटस्फोटाचं कारण बनलं. गोमतीनगरातल्या एका मोठ्या व्यावसायिकाने सांगितलं, की त्याची पत्नी त्याला मारहाण करायची. नंतर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड झालं. लॉकडाउनच्या काळात घरी असताना त्याच्या पत्नीला हे समजलं होतं. काही विचित्र केसेसही येतात. विक्रीकर विभागात काम करणाऱ्या व्यक्तीने पत्नीपासून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. पतीने न्यायाधीशांसमोर सांगितलं, की ‘भांडणाच्या वेळी पत्नी म्हणाली होती, की तू झोपल्यानंतर मी तुझ्या तोंडावर बसेन आणि तू मरशील.’ याबाबत पत्नीने न्यायालयात सांगितलं होतं, की ‘रागाच्या भरात मी तसं बोलले होते.’ पतीला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो घटस्फोट घेण्यावर ठाम राहिला, असं पदम कीर्ती यांनी सांगितलं.
प्रेम, लग्न आणि फसवणूक यावर आधारित ‘शादी में जरूर आना’ या बॉलिवूड चित्रपटासारखी अनेक प्रकरणंही न्यायालयात दाखल होत आहेत. दिव्या मिश्रा यांनी सांगितलं, की ‘2015मध्ये एका जोडप्यानं पळून जाऊन लग्न केलं. मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तीन महिन्यांनंतर, मुलगी तिच्या घरी गेली आणि तिला आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याचा आरोप तिनं केला. परंतु तपासात आरोप सिद्ध झाला नाही. दरम्यान 2022मध्ये मुलगा सरकारी नोकरीला लागला. तो अजूनही त्या मुलीची परत येण्याची वाट पाहत आहे. एका कंत्राटी शिक्षकानं त्याच्या मैत्रिणीशी लग्न केलं. दरम्यान, ती मुलगी पोलीस अधीक्षक झाली. काही दिवसांनी तिनं घटस्फोट मागितला. संबंध तुटल्यानंतर मुलानेही अभ्यास केला व तो पोलीस उपअधीक्षक झाला. या दोघांची न्यायालयात केस सुरू असताना दोघांच्या सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दोघांना बोलावून समजावून सांगितलं. त्यानंतर ती दोघं पुन्हा एकत्र राहू लागली आहेत.