“मी सुनिता राणे, 27 वर्षांची आहे. कुटुंबाच्या आग्रहामुळे आम्ही लग्न लवकर केलं. लग्नानंतर मी आणि माझा नवरा असे दोघंच कुटुंबापासून वेगळे राहतो. तसं आमचं स्वतःचं घऱ आहे पण ते माझ्या सासू-सासऱ्याचं म्हणजे जिथं आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र राहतं. माणसं जास्त आणि घर लहान शिवाय आमच्या कामामुळे आम्हाला कुटुंबात म्हणावा तसं वेळ द्यायला मिळणार नाही म्हणून लग्नानंतर मी आणि माझा नवरा कुटुंबापासून वेगळंच राहतो पण ते भाड्याच्या घरात. म्हणावं तसं आम्ही दोघं अजून आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. म्हणजे अजून आम्हाला करिअरमध्ये बरंच काही करायचं आहे. स्वतःचं घरही घ्यायचं आहे. त्यामुळे अजूनतरी आम्ही मुलाचा विचार केला नाही.” “नुकतंच आमच्या लग्नाला एक वर्ष झालं त्यासाठी आमच्या कुटुंबाने आमच्यासाठी एक सरप्राईझ पार्टी ठेवली होती. त्यानिमित्ताने आम्ही सर्व जण भेटलो. पण तिथं आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या वर्षावाऐवजी गूड न्यूजच्या प्रश्नांचा भडीमारच जास्त झाला. लग्नाला एक वर्ष झालं आता गूड न्यूज द्या, कधी देताय, तयारीला लागा. असंच जो तो म्हणत होता. त्यानंतरही जो कुणी भेटतो तो याचबाबत विचारतो, या सर्वांना काय सांगू, कसं आवरू काहीच समजत नाही आहे?”
मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सोनल आनंद - “बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की लोक आपल्याला उद्धटपणे असे प्रश्न विचारतात. पण खरंतर ते सहज असे प्रश्न विचारत असतील. म्हणजे आपल्या प्रश्नांचा एखाद्यावर नकारात्कम परिणाम होऊ शकतो, याची कल्पनाही त्यांना नसेल.” हे वाचा - Life@25 : “लग्न करेन तर त्याच्याशीच तेसुद्धा आईबाबांच्या परवानगीनेच; पण जमायचं कसं?” “अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहायला हवं. कारण अचानक असे प्रश्न विचारल्यानंतर एखाद्याच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो आणि जे घडू नये, तेच घडू शकतं. यावर उत्तम पर्याय म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्यावं आणि विषय बदलावा. खात्री नाही, बघूया, असं तुम्ही सांगू शकता. अशा परिस्थितीत मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे”, असा सल्ला डॉ. सोनल आनंद यांनी दिला आहे.