सोशल मीडिया सर्वांसमोर व्यक्त होण्याचं सोपं माध्यम. तिथं जितकी प्रसिद्धी मिळते तितकीच टिकाही होते. फोटो, व्हिडीओवर कमेंट येतात. या सर्वच कमेंट्स चांगल्या असतात असं नाही. कुणी अपशब्द वापरतं, कुणी आक्षेपार्ह कमेंट करतं, तर कुणी धमकीही देतं. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य म्हणून बरेच लोक काहीही बोलतात. पण यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांतून जावं लागतं. मानसिक त्रास तर होतोच पण आपली प्रतीमाही मलीन होते. अशा लोकांना रोखण्याचा, आवरण्याचा काही कायदेशीर मार्ग आहे का? याबाबत तक्रार करायची झाल्यास ती कुठे आणि कशी करायची?, अशा लोकांना काय शिक्षा होते? अॅड. सुजाता डाळींबकर - सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण कमेंटचे प्रमाण वाढत आहे. तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर काळजी करू नका. तुम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकता. यासाठी काय कायदा आहे.
धर्म, वंश, भाषा, निवासस्थान किंवा जन्मस्थानाच्या आधारावर विविध समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांवर IPC चे कलम 153A लागू केले जाते. या कलमांतर्गत तीन वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे. हे वाचा - Life@25 : शॉपिंग करताना लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करायचं? तर माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी कायदा 2000 च्या कलम 67 मध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट किंवा शेअर केले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आयटी कायद्याच्या कलम 67 मध्ये असे म्हटले आहे की जर कोणी सोशल मीडियावर पहिल्यांदा असे करताना दोषी आढळले तर त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच 5 लाख रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. एवढेच नाही तर अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास या प्रकरणातील दोषीला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. हे वाचा - Life@25 - मित्राला पैसे दिले पण तो आता परत करण्याचं नावच घेत नाहीये, काय करायचं? तुम्ही cybercrime.gov.in या सरकारी संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करू शकता. किंवा जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवू शकता.