मुंबई, 10 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया या काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातही केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं अलर्ट जाहीर केलाय. परदेशातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती पावलं उचलण्यासाठी तयारीही केली जातेय. कोरोनाबाबत देशातल्या नागरिकांमध्ये आता फारशी भीती नाही; मात्र विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी व डायबेटीस, रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. ती कशी घेता येईल, याबाबत ‘डीएनए’ने वृत्त दिलं आहे. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. कोरोनासारख्या महामारीमध्ये तर अशा व्यक्तींना जास्तच दक्ष राहावं लागतं. डायबेटीस असलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावं लागण्याची शक्यता जास्त असते. तसंच त्या व्यक्तीला न्यूमोनिया होण्याची शक्यता असते, अशा वेळी व्हेंटिलेटर सपोर्टही द्यावा लागू शकतो. बऱ्याचदा अशा रुग्णांचा मृत्यूही होण्याची शक्यता असते. थोडक्यात, डायबेटीस असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानं त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. कोरोना महामारीमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी डायबेटीस रुग्णांनी काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. हेही वाचा : मधुमेहाबद्दलचे 5 गैरसमज, जे लोकांना वाटतात खरे! जाणून घ्या त्यामागील सत्य - कोरोना महामारीची आणखी एखादी लाट आल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. फारसं घराबाहेर न पडता, जास्तीत जास्त कामं घरात राहूनच करता येतील हे पाहावं. - औषधं वेळच्या वेळी घेणं, औषधांचा पुरेसा साठा ठेवणं हेही अशा वेळी महत्त्वाचं असतं. - रक्तातल्या ग्लुकोजची तपासणी वरचेवर करावी. साखर वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. - कोरोनाची लक्षणं व दक्षता याबाबत सरकारनं सांगितलेल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करावं. - औषधांचा उगाचच अर्धवट साठा करू नये. सरकारकडून औषध पुरवठ्याची योग्य खबरदारी घेतली जाते. - साखर कमी होते आहे का याकडे रुग्णांनी लक्ष ठेवावं. यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः टाइप 1 डायबेटीस असणाऱ्या रुग्णांवर यामुळे फार गंभीर परिस्थिती ओढवू शकते. - कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. - तुमच्यासोबत इन्सुलिनचे जास्तीचे डोस ठेवा. अडचणीच्या वेळी उपयोगी पडू शकतात. - डायबेटीस असलेल्या रुग्णांनी सकस आहार घ्यावा. तळलेले पदार्थ आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. - आहार व व्यायामाचा दिनक्रम पाळावा. घराबाहेर पडणं शक्य नसल्यास घरीच व्यायाम करावा. - रक्तातली साखरेची पातळी सतत खाली-वर होत असल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.