उत्तर प्रदेशमधील वाराणसी (varanasi) हे एक असं शहर आहे, जिथं मृत्यूदेखील (death ) उत्सवाप्रमाणं साजरा केला जातो. अनेक लोक मोक्ष मिळवण्यासाठी आपले शेवटचे दिवस इथे येऊन राहातात आणि मृत्यूची वाट पाहातात. पण कोरोनामुळे मृत्यू्च्या दारालाही कुलूप लागलं आहे.
काशीमध्ये काही अशी घरं आहेत, जी फक्त मृत्यूसाठी बनवली गेली आहेत. याच्यातील एक आणि सगळ्यात जुनी जागा म्हणजे मुक्तीभवन. मोक्ष मिळवण्याची इच्छा असणारे लोक याठिकाणी येऊन मृत्यूची वाट पाहातात. वाराणसीच्या गौदोलिया येथील मिसिर पोखरा भागात हे भवन असून याठिकाणाला लोक डेथ स्पॉट (death spot) म्हणजेच मृत्यूचं ठिकाण म्हणून ओळखतात.
काही लोक याला मोक्ष भवनही म्हणतात. 100 वर्षांपूर्वी ते मोक्ष मिळवण्यासाठी बनवलं गेलं होतं, या भवनात आजदेखील केवळ 20 रुपये इतका शुल्क घेतलं जातं. मात्र, सध्या या भवनातील सगळ्या खोल्यांना कुलूप लावले गेले आहेत. मागच्या 10 महिन्यांपासून या भवनात एकही मृत्यू झाला नाही. कोरोनानं या भवनाच्या 100 वर्षांच्या परंपरेत अडथळा निर्माण केला आहे.
मोक्ष भवनचे सहप्रबंधक रवि विश्वकर्मा यांनी सांगितलं, की या भवनात आतापर्यंत 14000 लोकांनी आपला शेवटचा श्वास घेतला आहे. कोरोनाच्या आधी याठिकाणी सगळं तसंच सुरु होतं, जसं मागच्या 100 वर्षांपासून सुरु होतं. मात्र, लॉकडाऊननंतर चित्र बदललं.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या मोक्ष नगरीचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. काशीतील मोक्ष हवा असणाऱ्या यादीत बंगालचे हे 2 वृद्धदेखील सामील आहेत. मात्र, याठिकाणी आल्यानंतर त्यांना ही जागा बंद असल्याचं समजलं. दुसऱ्यांदा पुन्हा येऊ असं सांगत ते निराश होऊन परत गेले.
काशीमध्ये अनेक वर्षांपासून मोक्ष मिळवण्यासाठी लोक मंदीर आणि अन्य ठिकाणी जागा शोधत असतात. मात्र, 1906 मध्ये बनलेला हा मोक्ष भवन खास चर्चेत असतो. येथील आतापर्यंत झालेले14000 मृत्यू या गोष्टीचा पुरावा आहेत, की काशीमध्ये या भवनाचं महत्त्व किती आहे. इथली प्रत्येक खोली प्रत्येक माणसाच्या मृत्यूची गोष्ट सांगते. मात्र, कोरोनानं मोक्षाच्या त्या गोष्टीही थांबल्या आहेत.