मुंबई,11 एप्रिल- गाईचं दूध हे आरोग्यासाठी पूरक मानलं जातं. त्याचप्रमाणे विविध कारणांसाठी गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर केला जातो. काही लोक आरोग्यासाठी गोमूत्राचं सेवन करतात. मात्र गाईच्या गोमूत्राचं थेट सेवन करणं धोकादायक ठरू शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. `आयसीएआर`नं गोमूत्रावर संशोधन केलं आहे. या संशोधनातून आणखी काही निष्कर्ष समोर आले आहेत. `नवभारत टाईम्स`ने या विषयीची माहिती दिली आहे. गाईच्या ताज्या गोमूत्रात हानिकारक बॅक्टेरिया अर्थात जीवाणू असतात. त्यामुळे त्याचं थेट सेवन माणसासाठी योग्य नाही, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. बरेली येथील इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्युट अर्थात आयसीएआरनं हे संशोधन केलं आहे. ही संस्था जनावरांविषयी संशोधन करते. एकीकडे गोमूत्र माणसासाठी घातक ठरू शकतं, असं समोर आलं असलं तरी दुसरीकडे मात्र म्हशीचं मूत्र हे जास्त प्रभावी असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. (हे वाचा: वजन कमी करण्यासाठी भात खाणं टाळावं की चपाती? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचं सल्ला ) उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इज्जतनगरमधील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेतील भोजराज सिंह आणि पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांनी याबाबत संशोधन केलं. निरोगी गाईच्या दूधात किमान 14 प्रकारचे जीवाणू आढळतात. त्यात Escherichia coli हा जीवाणूदेखील असतो. यामुळे पोटाला संसर्ग होऊ शकतो. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष `रिसर्चगेट` या ऑनलाइन रिसर्च वेबसाईटवर प्रकाशित झाले आहेत. `आयव्हीआरआय`मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख भोजराज सिंह यांनी `टाइम्स ऑफ इंडिया`शी या विषयी संवाद साधला. ते म्हणाले,`` गाईचे दूध हे जीवाणूविरोधी असते, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत गोमूत्राचा वापर माणसानं करू नये. गाईच्या डिस्टिल्ड मूत्रात हानिकारक जीवाणू असतात की नाही, यावर अधिक संशोधन सुरू आहे. गाई, म्हशी आणि मानवाच्या 73 मूत्र नमुन्यांचे सांख्यिकीय विश्लेषण केले असता, म्हशीचे मूत्र हे गोमूत्रापेक्षा जास्त फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. S Epidermidis आणि E Rhapontici सारख्या जीवाणूंवर म्हशीचं मूत्र अधिक प्रभावी आहे,`` असं भोजराज सिंह यांनी स्पष्ट केलं.
``आम्ही संशोधनासाठी तीन प्रकारच्या गाईंच्या मूत्राचे नमुने घेतले. त्यात साहिवाल, थारपारकर आणि वृंदावनी (क्रॉस ब्रीड) या गायींचा समावेश होता. यासोबत म्हशी आणि माणसांच्या मूत्राचे नमुने घेतले. जून ते नोव्हेंबर 2022 दरम्यान या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात एका निरोगी माणसाच्या मूत्रातदेखील धोकादायक जीवाणू असल्याचं दिसून आलं,`` असं भोजराज सिंह यांनी सांगितलं. ``गाईचं डिस्टिल्ड मूत्र कॅन्सर आणि कोविडशी लढण्यासाठी उपयुक्त आहे,`` असं आयव्हीआरआयचे माजी संचालक आर.एस. चौहान यांनी सांगितलं.