नवी दिल्ली 06 एप्रिल : वजन कमी करणं हे सोपं काम नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिममध्ये अनेक तास घाम गाळतात, विविध प्रकारचं डाएट फॉलो करतात. काही जण वजन कमी करण्यासाठी पोळी खाणं बंद करतात, तर काही जण भातापासून दूर राहतात. पोळी न खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं की भात न खाल्ल्याने याबाबत नेहमीच संभ्रम असतो. त्याबद्दल जाणून घेऊ या. ‘अमर उजाला’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. वजन कमी करण्यासाठी काही जण पोळी किंवा भात खाणं बंद करून केवळ सॅलड खाणं पसंत करतात. वजन कमी करण्याच्या नियमांबाबत सांगायचं झालं, तर दिवसभर तुम्ही जितक्या प्रमाणात कॅलरीचं सेवन केलंय, त्याहून अधिक कॅलरीज व्यायाम, वर्कआउट करून तुम्ही सहजरीत्या कमी करू शकता. Cold Drink Side Effects: उन्हाळ्यात हवंहवंसं वाटणारं कोल्ड्रिंक ठरु शकतं आजारांचं आमंत्रण अर्धी वाटी भातामध्ये 140 कॅलरीज असतात. दोन पोळ्यांमध्ये साधारणपणे 130-140 कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही डाळीसोबत भात खा किंवा पोळी खा, तुमच्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण जवळपास सारखंच असतं. अशा वेळी भात आणि पोळी खाणं वर्ज्य करण्यापेक्षा भात करण्यासाठी वापरण्यात येणारा तांदूळ आणि पोळी करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य यामध्ये बदल करण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी बेसनाची पोळी, मल्टी ग्रेन पोळी किंवा कोंड्याच्या पिठाची पोळी खाऊ शकता. त्यामुळे शरीरात कॅलरीज योग्य प्रमाणात जातील. शिवाय लवकर भूकही लागणार नाही. वजन कमी करण्यासाठी मणिपुरी तांदळापासून तयार केलेला भात खाणं उपयुक्त ठरतं. त्यामुळे पोट तर भरतंच. शिवाय लवकर भूक लागत नाही.
वजन कमी करण्यासाठी आहारात भात आणि पोळी यांचं प्रमाण नेमकं किती आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आहारात योग्य प्रमाणात भात आणि पोळीचा समावेश असणं गरजेचं आहे. तसंच आहारात सामाविष्ट असणारा भात, पोळी बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरलं आहे, हेसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. भात शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घेतल्यास वजन वाढणार नाही. एखाद्या व्यक्तीचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढणं, विविध आजारांना आमंत्रण देत असते. त्यामुळे वजन वाढू नये, ते नियंत्रणात राहावं, यासाठी वेळीच खबरदारी घेणं महत्त्वाचं असून, आहारात योग्य त्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी आहारतज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.