मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिसून येत आहेत `ही` नवी लक्षणं; सावधगिरी बाळगण्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं आवाहन

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिसून येत आहेत `ही` नवी लक्षणं; सावधगिरी बाळगण्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं आवाहन

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, सध्या बहुतांश रुग्णांमध्ये सामान्य लक्षणं (Symptoms) दिसत आहेत. परंतु, त्यात काही लक्षणं नव्यानं दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, 28 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून जगातले अनेक देश कोरोना (Corona) महामारीचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढताच निर्बंध, लॉकडाउनसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. भारतातही काही वेगळी स्थिती नाही. कोरोना विषाणू सातत्यानं म्युटेट (Mutate) होत आहे. कोरोनाचे आतापर्यंत अल्फा, बीटा, डेल्टा, ओमिक्रॉन आदी व्हेरियंट (Variant) आढळून आले आहेत. सध्या अनेक देश ओमिक्रॉनचा (Omicron) सामना करत आहेत. भारताचा विचार करता देशात तिसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध लागू करण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांनी कोरोना गाईडलाईन्सचं काटेकोर पालन करावं, अशी आग्रही भूमिका आरोग्यविषयक तज्ज्ञांनी मांडली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, सध्या बहुतांश रुग्णांमध्ये सामान्य लक्षणं (Symptoms) दिसत आहेत. परंतु, त्यात काही लक्षणं नव्यानं दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

सध्या देशभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून देशात दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2927 होती. मंगळवारी ही संख्या 2483 होती. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी बुधवारी (27 एप्रिल) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. यापूर्वीच्या लाटांप्रमाणे यावेळी देखील सुरुवातीच्या टप्प्यात संसर्ग रोखणं हे आपलं प्राधान्य असेल आणि यासाठी आपल्याला टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या धोरणाचा अवलंब करावा लागेल, असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाच नाही तर 'या' कारणासाठी देशात लसीकरण महत्वाचं! तज्ज्ञ म्हणतात..

सध्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसत आहेत. काही रुग्णांमध्ये काही नवी लक्षणं देखील दिसून आली आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. `एएनआय` या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गत 10 दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढली आहे, असं दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी सांगितलं.

डॉ. मोदी म्हणाले, ``बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. सध्या कोविड-19 च्या लक्षणांमध्ये प्रामुख्यानं ताप, नाक वाहणं, शिंका येणं, घशात खवखव होणं आणि खोकला अशा सौम्य लक्षणांचा समावेश आहे. परंतु, अलीकडे डायरिया (Diarrhea) हेदेखील लक्षण कोरोनाबाधितांमध्ये दिसून आलं आहे. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी मास्क वापरणं बंधनकारक आहे. ज्या वेगानं कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे, ती पाहता सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे.``

``कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पहिल्यांदाच डायरियासारखी पोटाशी निगडीत समस्या दिसून आली आहे. गेल्या 10 दिवसांत डायरियासारख्या आजाराशी निगडीत अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. परंतु, रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अतिशय कमी आहे. ज्या रुग्णांना अन्य गंभीर आजार आहेत, त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासत आहे,`` असं डॉ. मोदी यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus symptoms, Disease symptoms