लंडन, 21 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसमधून (coronavirus) सध्या बहुतेक रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे ही दिलादायक बातमी आहे. पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांना पुन्हा कोरोना (corona reinfection) होत असल्याची काही प्रकरणंही समोर आली आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर तिला पुन्हा कधी कोरोनाची लागण होऊ शकते, याबाबत संशोधन झालं. दरम्यान नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार किमान सहा महिने तरी कोरोनामुक्त व्यक्तींना कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका नाही असं दिसून आलं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं (oxford university) ब्रिटिश आरोग्य कर्मचाऱ्यांवर केलेल्या एका संशोधनात ही नवीन माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असतो. एप्रिल ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 30 आठवड्यांच्या कालावधीमध्ये या कर्मचाऱ्यांचे निरीक्षण करण्यात आलं होतं. ज्यांच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या होत्या त्यांना पुन्हा कोरोना झाला नसल्याचे या संशोधनात समोर आलं आहे. त्यांच्यात पुन्हा कोरोना होण्याचा धोका खूप दुर्मिळ असल्याचं संशोधनात सांगण्यात आलं. अँटीबॉडी नसलेल्या 11,052 कर्मचार्यांपैकी 89 कर्मचार्यांना कोरोनाची सामान्य लक्षणं दिसून आली होती तर अँटीबॉडीज असलेल्या 1,246 कर्मचार्यांपैकी कोणालाही संक्रमण झालं नाही. अँटीबॉडी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण खूप कमी आढळून आले आहे. तर अँटीबॉडी नसलेले 76 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. याच्या तुलनेत तीन जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. सहा महिन्यांपर्यंत कोरोनाचा धोका पुन्हा होत नसल्याचा दावा संशोधकांनी केला. हे वाचा - तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; मिळणार आपात्कालीन मंजुरी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याविषयी सांगितलं की, जगभरातील 51 लाख रुग्णांना एकदा कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमीच आहे. कारण निदान या सर्वांना पुढचे सहा महिने कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही. ऑक्सफर्डच्या नफफिल्ड डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन हेल्थमधील प्राध्यापक डेव्हिड आयर म्हणाले, “ज्यांना कोरनाची लागण होऊन गेली आहे त्यांच्यासाठी खरोखरच ही गूड न्यूज आहे. कारण आम्ही खात्रीशीरपणे सांगू शकतो की, त्यांना किमान सहा महिन्यांच्या छोट्या कालावधीसाठी तरी पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही” हे वाचा - पुण्यात Herd immunity विकसित होण्याचे संकेत; म्हणजे नेमकं काय? SARS-CoV-2 व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर आजारी झालेल्या लोकांमध्ये तयार झालेली प्रतिकारशक्ती अल्पकाळासाठी असेल असा अंदाज होता. त्यामुळे लोक पुन्हा आजारी पडतील अशी शंका व्यक्त होत होती. पण असं मोजक्या प्रकरणांत घडलं. रुग्णांना सहा महिन्यांपर्यंत इम्युनिटी मिळत असल्याचं आयर यांनी सांगितलं. त्यामुळे या काळात काळजी करण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले. या संशोधनाचे परिणाम इतर शास्त्रज्ञांद्वारे पुनरावलोकित करण्यात आलेलं नाहीत. मात्र MedRxiv वेबसाइटवर याआधीच प्रकाशित करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.