

ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रेझेनका-सीरम इन्स्टिट्युट, फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना कंपनीच्या कोरोना लशी परिणामकारक दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. पुढील वर्षापर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याच वर्षात या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.


यूएसमधील फायझर (Pfizer Inc) आणि जर्मनमधील बायोएनटेक (BioNTech) कंपनीनं तयार केलेली कोरोना लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 95% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.


तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या सुरुवातीच्या परिणामांमध्ये सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या COVID-19 वर ही लस उत्तमरित्या काम करते असं स्पष्ट झालं. त्यामुळे आता या लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.


अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे फायझर कंपनीनं कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.


प्रभावी आणि सुरक्षित अशी लस असल्याचा पुरावा मिळाल्यानं ही लस आपात्कालीन वापरासाठी योग्य आहे. त्यामुळे तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच प्रशासन या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देईल, अशी आशा कंपनीला आहे.