Home /News /lifestyle /

कोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL

कोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे कोव्हिड सेंटर आहे की लग्नमंडप असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

    मुंबई, 27 सप्टेंबर : लग्न (wedding) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल असा क्षण असतो. आपल्या जीवनातील हा असा क्षण मोठ्या थाटामाटात, उत्साहात पार पडावा असं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. विशेषत: मुलींना आपल्या लग्नाबाबत खूप स्वप्नं पाहिलेली असतात. मात्र सध्या कोरोनाव्हायरसच्या या परिस्थितीत अनेकांना अगदी साधेपणात लग्न उरकावं लागतं आहे. त्यातही वधू किंवा वर कोरोना पॉझिटिव्ह असतील मग काय हा सोहळा पुढे ढकलला जातो. मात्र केरळमधील एका कोरोनाग्रस्त तरुणीच्या बाबतीत तसं नाही झालं. तिच्यावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तरी ठरलेल्या दिवशीच तिचा निकाह करण्याचा ठरलं आणि कोव्हिड सेंटरला रुग्णांनी अक्षरश: लग्नमंडपाचं रूप आणलं. केरळच्या एका कोव्हिड सेंटरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एर्नाकुलममधील एका कोव्हिड केअर सेंटरमधील हा व्हिडीओ आहे. जिथं अगदी जल्लोषात एका निकाह सोहळा होतो आहे. या नवरीला कोरोनाव्हायरसची लागण झाली मात्र ती कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या कुटुंबाने तिचं ठरलेलं लग्न पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या दिवशीच लग्न झालं. आता लग्न म्हटलं की नाचगाणं आलंच. पण कोव्हिड सेंटरमध्ये कुठे कोण नातेवाईक, मित्रमैत्रिणी, पाहुणे नाचायला येणार. नवरीला वाटलं आता आपल्याला आपल्या लग्नात असं काही पाहायला मिळणार नाही. मात्र झालं उलटंच. तिच्या लग्नात ती सजली नटली, नाचायला वऱ्हाडीदेखील आले आणि अगदी जल्लोषात तिचा निकाह सोहळा झाला. हे वाचा - ही काय भानगड बुवा! लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या कोव्हिड सेंटरमध्ये तिच्यासह असलेले इतर कोरोना रुग्णच तिचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी झाले आणि त्यांनी तिच्या निकाहात धम्माल केली. नवरीच्या भोवती फिरत, गाणं गात, नाचत त्यांनी तिचा उत्साह वाढवला. तिच्यासह फोटो काढले. कोरोनाव्हायरस झाला म्हणून कुणाचं आयुष्य थांबत नाही की आयुष्यातील मौजमजा थांबत नाही. उलट एका नव्या आयुष्याला सुरुवात करता येते, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Social videos, Viral videos

    पुढील बातम्या