बीजिंग, 05 फेब्रुवारी : आपण सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी लोक काय काय नाही करत. फक्त मेकअपच नाही तर आता कित्येक जण कॉस्मेटिक सर्जरीकडेही वळू लागले आहेत. कुणाला गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ हवेत, तर कुणाला टोकदार नाक आणि अशाच नाकासाठी चीनमधील एका अभिनेत्रीनं कॉस्मेटिक सर्जरी केली आणि ती तिला चांगलीच महागात पडली.
चिनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लियूनं (Chinese actress and singer Gao Liu) आपल्या नाकाची कॉस्मेटिक सर्जरी केली आणि आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे, असंच आता तिला वाटू लागलं आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार गाओनं चिनी सोशल मीडिया सिना वीबोवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं सांगितलं, ऑक्टोबरमध्ये तिच्या एका मित्रानं गुआंगजौमध्ये एका प्लॅस्टिक सर्जनला भेटवलं, तिथं छोटंसं ट्रीम करावं म्हणून तिनं नाकाची सर्जरी केली.
लिओ म्हणाली, मी नाकाची सर्जरी केली. जवळपास चार तास ही सर्जरी झाली. या चार तासांनंतर मी अधिक सुंदर दिसेन असं मला वाटलं. पण हे चार तास म्हणजे माझ्यासाठी एका भयानक स्वप्नाची सुरुवात होती.
लिओच्या नाकाच्या टोकाच्या त्वचेवर दुष्परिणाम झाला. नाकाच्या टोकावरील त्वचा काळी पडली. तिला वारंवार संसर्ग होऊ लागाल. तिच्या नाकाला नेक्रोसिस झालं म्हणजे नाकावरील पेशी नष्ट झाल्या. यासाठी तिनं कॉस्मेटिक सर्जरीला जबाबदार धरलं आहे. दरम्यान रिपोर्टनुसार ज्या क्लिनिकमध्ये तिनं सर्जरी केली. तिथं अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत.
हे वाचा - 2 वर्षांच्या मुलानं मुलींसारखे वाढवले केस; कारण वाचून तुम्हालाही हेवा वाटेल
अधिक सुंदर दिसण्याच्या नादात तिनं आपल्या हातचे प्रोजेक्टही गमावले आहेत. आता तिचं नाक ठिक होण्यासाठी कमीत कमी एक वर्ष लागेल असं सांगितलं जातं आहे. आपण जी चूक केली ती तुम्ही करू नका असंच आवाहन तिनं आपले असे फोटो शेअर करत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Surgery