Home /News /lifestyle /

आई-वडिलांच्या घटस्फोट प्रकरणात मुलाला 10 कोटी डॉलरचा दंड! काय आहे अजब प्रकरण?

आई-वडिलांच्या घटस्फोट प्रकरणात मुलाला 10 कोटी डॉलरचा दंड! काय आहे अजब प्रकरण?

ब्रिटनमध्ये ही सर्वांत मोठी डिव्होर्स केस म्हणून गाजते आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

लंडन, 23 एप्रिल: आई-वडिलांच्या घटस्फोट प्रकरणात त्यांच्या मुलाला 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी डॉलरचा दंड झाल्याची घटना लंडनमध्ये (London) घडली आहे. तेमूर अख्मेदोव्ह (Temur Akhmedov) असं दंड झालेल्या मुलाचं नाव असून, आईला पोटगीची रक्कम कमी मिळावी, यासाठी वडिलांचं उत्पन्न लपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न त्याने केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. लंडन कोर्टाच्या न्यायाधीश ग्विनिथ नॉवेल्स यांनी 21 एप्रिल रोजी हा निकाल दिला आहे. 'लाइव्हमिंट'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रशियन अब्जाधीश फरखाद अख्मेदोव्ह (Farkhad Akhmedov) आणि त्यांची पत्नी तातियाना अख्मेदोव्ह (Tatiana Akhmedov) यांच्यातला घटस्फोटाचा हा खटला 2016पासून सुरू आहे. त्या वेळी न्यायाधीशांनी फरखाद यांनी पत्नी तातियानाला 631 दशलक्ष डॉलरची पोटगी द्यावी असा निकाल दिला होता. त्यानंतर एवढी पोटगी देण्यास नकार देताना फरखाद यांच्याकडून आपल्या संपत्तीचे दाखले देण्यात आले. एवढी पोटगी देण्याएवढी आपली संपत्ती नाही, हे दाखवण्यासाठी त्यांचा मुलगा तेमूर याने त्यांना मदत केली. 'या मुलाने त्याच्या आईला 631 दशलक्ष डॉलर्सची पोटगी मिळू नये म्हणून त्याच्या वडिलांना शक्य ती सर्व प्रकारची मदत केली. त्याने कोर्टात अनेक वेळा खोटं सांगितलं, कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केलं आणि त्याच्या संपत्तीचं पूर्ण विवरण देण्यात तो अपयशी ठरला. तो त्याच्या वडिलांसाठी कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा करू शकेल असा मुलगा आहे, असं मला आढळलं. आर्थिक साह्यासाठी तो त्याच्या वडिलांवर अवलंबून आहे, यासाठी तो हे करतो आहे, यात शंकाच नाही,' असं न्यायाधीश ग्विनिथ नॉवेल्स (Gwynneth Knowles) यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या कारणासाठी तेमूरला 100 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. आपण कॉलेजमध्ये असताना शेअर बाजारात डे ट्रेडिंग (Day Trading) करताना एका दिवसात 50 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गमावली होती, असं तेमूरने कोर्टात सांगितलं होतं. सुरुवातीला एकदा यश मिळाल्यामुळे डे ट्रेडिंग केलं आणि नंतर त्यात अपयश आल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं त्याने सांगितलं. कोर्टाने मात्र त्याचा हा दावा खोडून काढला आणि त्याच्या आईपासून वडिलांची संपत्ती लपवण्यासाठी हा मार्ग काढलेला होता, असं कोर्टाने म्हटलं. Online Shopping करताना तुमची छोटीशी चूकही पडेल महागात; रिकामं होईल बँक खातं तातियाना अख्मेदोव्ह यांना लंडनच्या हाइड पार्क परिसरातल्या आलिशान फ्लॅटचा ताबा हवा आहे. तसंच, फरखाद यांनी 2014मध्ये 260 दशलक्ष युरोजना खरेदी केलेल्या एम. व्ही. लुना नावाच्या 115 मीटर लांबीच्या यॉटची मालकी हाही या खटल्यातला वादाचा मुद्दा होता. 2016मधल्या घटस्फोटाच्या निकालानंतर फरखाद रशियात स्थलांतरित झाले. त्यांचा मुलगा तेमूर मात्र ब्रिटनचा रहिवासी आहे. त्यामुळे त्याच्या आईला स्थानिक मालमत्ता ताब्यात घेणं सोपं आहे. 'कोर्टाने आपल्या मूळ चुकीच्या आणि दिशाभूलीवर आधारित निर्णयाच्या आधारेच निष्पाप आणि निष्ठावान मुलाविरोधात निकाल दिला आहे,' अशी प्रतिक्रिया फरखाद यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. ब्रिटनच्या राणी Queen Elizabeth II साजरे करतात दोन वाढदिवस; पण का? हे आहे कारण दरम्यान, तेमूर अख्मेदोव्ह या निकालाशी सहमत नसल्याचं त्याच्या प्रवक्त्याने सांगितलं; मात्र, 'मी आई आणि वडील अशा दोघांवरही प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये योग्य तोडगा निघत असेल, तर एवढी रक्कम मोजण्यास माझी काही हरकत नाही,' असंही तेमूरचं मत असल्याचं प्रवक्त्याने स्पष्ट केलं. 'सर्व सुखी कुटुंबं एकसारखी असतात; मात्र सर्व दुःखी कुटुंबं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने दुःखी असतात,' असं लिओ टॉलस्टॉयचं वाक्य आहे. त्या वाक्याचा आधार घेऊन न्या. ग्विनिथ नॉवेल्स यांनी टिप्पणी केली, की 'अख्मेदोव्ह कुटुंब हे माझ्या कोर्टात आलेल्या सर्वांत दुःखी कुटुंबांपैकी एक असावं.' दरम्यान, सध्या केवळ लंडनमध्येच नव्हे, तर जगभरातच या हायप्रोफाइल घटस्फोटाची आणि वेगळ्या निकालाची चर्चा आहे.
First published:

Tags: Divorce, United kingdom

पुढील बातम्या