मुंबई, 25 ऑक्टोबर: कॅन्सर म्हणजे कर्करोग हा अनेक गंभीर आजारांपैकी एक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कर्करोगाचा त्रास कमी करणारी काही औषधं सापडली आहेत. कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये शस्त्रक्रियेनंतर तो आजार पूर्ण बराही झालेला आहे, मात्र कर्करोग समूळ नष्ट करणारं कोणतंही औषध अजून सापडलं नाही. कर्करोगावरील उपचार खूप महाग असल्यामुळे सामान्यांना ते परवडत नाहीत. कानपूरच्या एका वैद्यकीय महाविद्यालयानं स्तनांच्या कर्करोगासाठी केवळ एक रुपयात उपचार शोधला आहे. ऑन्को मॅमोप्लास्टी टेक्निकद्वारे एका महिलेवर केलेल्या उपचारांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. उत्तर प्रदेशातील गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी कर्करोगावरील उपचारांसाठी ऑन्को मॅमोप्लास्टी पद्धती शोधली आहे. या उपचार पद्धतीचा वापर स्तनांचा कर्करोग असणाऱ्या स्त्रियांसाठी प्रभावी ठरू शकेल. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काला म्हणाले, “स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णांमधील केवळ संक्रमित भाग या नव्या उपचार पद्धतीनं काढून टाकला जातो आणि व्हॉल्युम रिप्लेसमेंट पद्धतीनं त्याजागी नवा आकार दिला जातो.” एका 48 वर्षीय महिलेवर या पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हेही वाचा - Surya Grahan 2022: गर्भवती महिलांसाठी सूर्यग्रहण पाहणे खरच हानिकारक आहे? काय आहेत दोन्ही बाजू स्तनांचा कर्करोग झालेल्या महिलांवर शस्त्रक्रिया झाल्यावर तो भाग काढून टाकल्यामुळे अनेकदा महिलांना नैराश्य यायचं. काही वेळा यातून आत्महत्त्येचं पाऊलही उचललं जायचं. म्हणूनच ही नवी उपचार पद्धती फायद्याची ठरू शकेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जे परिणाम होतात, ते कमी करण्यासाठीही या उपचार पद्धतीचा वापर केला जातो आहे. स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. त्यातच समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांकडे या आजारावरील उपचारांसाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे अर्धवट उपचार करून सोडून दिले जातात व रुग्णाची परिस्थिती गंभीर बनते. अशा घटकांसाठी ही नवी उपचार पद्धती खूप आशादायी ठरू शकते. कारण यात केवळ 1 रुपयामध्ये उपचार केले जातात. यूकेमधील कर्करोग संशोधनानुसार, ब्लड कॅन्सर, घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, बोन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर असे कर्करोगाचे 200 प्रकार असतात. कार्सिनोमा : हा कर्करोग त्वचेतील पेशींमध्ये होतो. त्यानंतर तो आत पसरतो. ल्युकेमिया : हा पांढऱ्या पेशींचा कर्करोग आहे. रक्तपेशी बनवणाऱ्या बोन मॅरोमधील पेशी समुच्चयामध्ये तयार होतो. सारकोमा : हा कर्करोग हाडं, कार्टिलेज, मांसपेशी आणि रक्तवाहिन्यांसारख्या जोडणाऱ्या पेशी समुच्चयामध्ये निर्माण होतो. लिंफोमा आणि मायलोमा : हा कर्करोग रोगप्रतिकार शक्ती तयार करणाऱ्या पेशींमध्ये होतो. मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये होणारा कर्करोग मज्जासंस्थेशी निगडीत असतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. मात्र त्यांचे उपचार खर्चिक आणि सामान्यांच्या आवाक्यातले नाहीत. त्यामुळेच कानपूरमधील डॉक्टरांनी शोधलेल्या नव्या उपचार पद्धतीचा सामान्यांना फायदा होऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.