जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सरोगसी म्हणजे काय नेमकं काय? त्यामुळे प्रीती झिंटा बनली जुळ्या मुलांची आई

सरोगसी म्हणजे काय नेमकं काय? त्यामुळे प्रीती झिंटा बनली जुळ्या मुलांची आई

सरोगसी म्हणजे काय नेमकं काय? त्यामुळे प्रीती झिंटा बनली जुळ्या मुलांची आई

अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) नुकतीच सरोगसीद्वारे (Surrogacy) जुळ्या मुलांची आई बनली आहे. त्यामुळे सरोगसीद्वारे मुलांना जन्म देणाऱ्या एकता कपूर, तुषार कपूर, आमीर खान, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान आदी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या यादीत प्रीती झिंटाचाही समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरोगसीबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 19 नोव्हेंबर-  अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) नुकतीच सरोगसीद्वारे (Surrogacy) जुळ्या मुलांची आई बनली आहे. त्यामुळे सरोगसीद्वारे मुलांना जन्म देणाऱ्या एकता कपूर, तुषार कपूर, आमीर खान, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान आदी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या यादीत प्रीती झिंटाचाही समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरोगसीबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सरोगसीबद्दल बहुतांश जणांच्या मनात कुतूहल असतं. सरोगसीचा अगदी सोप्या शब्दांत अर्थ सांगायचा झाला, तर एका दाम्पत्याचं बाळ दुसऱ्या महिलेच्या पोटात वाढवायचं. गेल्या काही वर्षांत सरोगसीचं प्रमाण वाढल्यामुळे सरकारने त्यावर निर्बंध घालून कमर्शियल अर्थात व्यावसायिक सरोगसीवर (Commercial Surrogacy) बंदी घातली आहे; मात्र इच्छुक महिलांना सरोगेट मदर बनण्याची परवानगीही देण्यात आली आहे. कोरोनाच्या आगमनानंतर देशात आलेली मंदी आणि बेरोजगारी यांमुळे सरोगेट मदर्सच्या (Surrogate Mothers) प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. घरोघरी धुणी-भांडी, साफसफाई आदी करणाऱ्या महिला किंवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगार महिला कमी कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हेतूने सरोगेट मदर होण्याचा पर्याय निवडतात. कपड्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या पिंकी माइकवान नावाच्या महिलेने आपला सरोगेट मदर बनण्याचा अनुभव ‘टाइम्स’शी शेअर केला. तिने दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीमध्ये सुपरव्हायझर म्हणून काम करत असताना तिला महिन्याला 6984 रुपये पगार मिळत होता. 2020मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाउनमध्ये तिची नोकरी गेली. तिच्याकडे काहीच बचत शिल्लक नव्हती. आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या पालनपोषणाचा प्रश्न तिला सतावू लागला. त्यानंतर त्या महिलेने सरोगेट मदर बनण्याचा पर्याय निवडला. कारण त्यातून मिळणाऱ्या पैशांतून भविष्याची तरतूद करणं शक्य होणार होतं. सरोगसीच्या माध्यमातून पिंकीने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यासाठी तिला 5 लाख 49 हजार 430 रुपये मिळाले. लॉकडाउनच्या काळात अनेक सुशिक्षित महिलांनीही पैसे मिळवण्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा पर्याय निवडला. सरोगसीचे प्रकार सरोगसी दोन प्रकारची असते. ट्रॅडिशनल (Traditional Surrogacy) आणि जेस्टेशनल (Gestational Surrogacy) असे ते दोन प्रकार आहेत. ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं (Sperms) अर्थात स्पर्म्सचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी (एग्ज) (Eggs) मीलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला अर्थात सरोगेट मदर ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर (Biological Mother) असते. थोडक्यात सांगायचं तर त्या बाळाशी तिचं रक्ताचं नातं असतं. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे (Test Tube) सरोगेट मदरच्या गर्भाशयात (Uterus) प्रत्यारोपित केला जातो. थोड्याशा असंवेदनशील भाषेत वस्तुस्थिती सांगायची झाली, तर नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी त्या सरोगेट मदरचं गर्भाशय भाड्याने घेतलं जातं. त्यातला गर्भ पूर्णतः बाहेरचा असतो, वेगळ्या जोडप्याच्या मीलनातून तयार झालेला असतो. त्यामुळे जेस्टेशनल सरोगसीत सरोगेट मदरचं बाळाशी रक्ताचं नातं नसतं. (हे वाचा: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे )  सरोगसीद्वारे बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यामागे बरीच कारणं असू शकतात. काही दाम्पत्यांना मूल होण्यात काही वैद्यकीय अडचणी (Infertility) असतात. काही वेळा गर्भधारणेमुळे संबंधित महिलेच्या जिवाला धोका उत्पन्न होण्यासारखी काही तरी गुंतागुंत असते. तसंच, काही महिलांना गर्भारपणासाठी पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. यांपैकी कोणत्याही कारणाने सरोगसीचा पर्याय स्वीकारला जातो. त्यासाठी सरोगेट मदर होणारी महिला आणि ज्या जोडप्याला सरोगसीद्वारे मूल हवं आहे ते जोडपं यांच्यामध्ये एक करार केला जातो. त्यानुसार, सरोगसी करून घेणारं दाम्पत्यच होणाऱ्या बाळाचे कायदेशीर आई-वडील असतात. सरोगेट मदरचा संबंध केवळ बाळ जन्माला घालेपर्यंतच असतो. बाळाच्या जन्मानंतर ते आई-वडिलांकडे दिलं जातं. गर्भारपणाच्या काळात स्वतःचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, तिच्या गर्भातल्या बाळाचं चांगलं भरणपोषण होण्यासाठी चांगला आहार, औषधं आदी कारणांसाठी सरोगेट मदरला पैसे दिले जातात. सरोगसीचा दुरुपयोग होत असल्याचं पाहून केंद्र सरकारने त्याबद्दल काही नियमही निश्चित केले. 2019 साली व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली. त्यानुसार आता परदेशी नागरिक, सिंगल पॅरेंट, घटस्फोटित, लिव्ह इन पार्टनर्स, एलजीबीटी समुदाय आदींसाठी सरोगसीचा पर्याय उपलब्ध नाही. 2020 सालच्या सरोगसी रेग्युलेशन विधेयकात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, त्यानुसार इच्छुक महिलेला सरोगेट बनण्याची परवानगी देण्यात आली आहे.सरोगेट मदर बनण्यास इच्छुक असलेल्या महिलेकडे पूर्णतः फिट असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं. तसंच, सरोगसी करून घेणाऱ्या दाम्पत्याकडेही ते मूल जन्माला घालू शकत नसल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात