नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : आहार आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. जी व्यक्ती पोषक आहार घेते, त्या व्यक्तीचं आरोग्य उत्तम राहतं. चुकीचा आहार, प्रक्रियायुक्त पदार्थ आदी कारणांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. आपल्या रोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भाताच्या निरनिराळ्या रेसिपीज आपण बनवतो. बिर्याणी हा त्यापैकीच एक प्रकार होय. बिर्याणी म्हटलं, की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हैदराबाद, लखनौच्या बिर्याणीचे असंख्य चाहते आहेत. देशातल्या अनेक भागांमध्ये या बिर्याणीची विक्री करणारी दुकानं, रेस्टॉरंट, हॉटेल्स आहेत; पण सध्या बिर्याणीवरून वाद सुरू झाला आहे. बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे पुरुषांच्या सेक्स ड्राईव्हवर (पुरुषांचे लैंगिक आरोग्य) परिणाम होत असल्याचं पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी सरकारमधले माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांचा आरोप आहे. त्यामुळे बिर्याणी विक्री करणारी दोन स्थानिक दुकानं घोष यांनी बंद केली आहेत. बिर्याणी मसाल्यामुळे खरंच अशा पद्धतीचा परिणाम होतो का याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. आशियानेट न्यूज डॉट कॉम ने याविषयीची माहिती दिली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ घोष यांनी बिर्याणी विक्री करणारी दोन स्थानिक दुकानं बंद केली आहेत. यामागे नेमकं काय कारण असावं, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. खुद्द रवींद्रनाथ घोष यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. `बिर्याणी बनवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री आणि मसाल्यांमुळे पुरुषांचा सेक्स ड्राइव्ह कमी होतो, असा आरोप अनेकांनी केला असून, याबाबत तक्रारीदेखील आल्या आहेत,` असं घोष यांनी सांगितलं आहे.
घोष यांनी सांगितलं, `बिर्याणी खाल्ल्यानं सेक्स ड्राईव्ह कमी होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पुरुषांच्या सेक्स ड्राइव्हवर परिणाम करणारे असे कोणते मसाले बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जातात, हे मला माहिती नाही.` बिर्याणी हा पदार्थ सर्वप्रथम मुस्लिमांनी बनवला. बिर्याणी बनवण्यासाठी प्रामुख्याने तांदूळ, मांस आणि भारतीय मसाल्यांचा वापर केला जातो. कालांतराने शाकाहारी अर्थात व्हेज बिर्याणीदेखील बनवली जाऊ लागली. हे वाचा - फिट आणि तंदुरुस्त सेलिब्रिटींना कसा काय हार्ट अटॅक येतो? सर्वांनीच या गोष्टींची काळजी घ्यावी बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ आणि मांसाव्यतिरिक्त बडीशेप, काळी मिरी, वेलची, जायफळ, धणे, कढीपत्ता, दालचिनी, मोठी वेलची, हळद, लवंगसह अन्य मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. या मसाल्यांचा वापर बिर्याणी बनवणाऱ्या व्यक्ती आपापल्या पद्धतीने करतात. काही जण बिर्याणी बनवताना मसाल्यांचा जास्त प्रमाणात, तर काही जण मसाल्यांचा कमी प्रमाणात वापर करतात. घोष यांनी जी दुकानं बंद केली, ते विक्रेते बिर्याणी बनवण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा वापर करत होते, हे समजू शकलेलं नाही; पण सर्वसामान्यपणे बिर्याणीसाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे पुरुषांच्या सेक्स ड्राइव्हवर कोणताही परिणाम होत नाही.