मुंबई, 04 ऑक्टोबर : सध्याच्या काळात दैनंदिन आयुष्य दगदगीचं आहे. स्पर्धेत टिकून राहायचं तर कष्ट करावेच लागतात; पण यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष करणं अंगाशी येतं. आहार आणि व्यायाम एकमेकांसाठी पूरक हवेत. त्यांची योग्य सांगड तब्येतीस उपयुक्त ठरते. यासाठी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट पाळावं लागतं. शरीरातली ऊर्जा टिकून राहण्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याच सुका मेव्यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अक्रोड. अक्रोड खाणं हे तब्येतीसाठी हिताचं आहे; पण अनेकांना अक्रोडाच्या उपयुक्ततेबबद्दल अपुरी माहिती असते. अक्रोड पाण्यात भिजवून किंवा सुकेदेखील खाल्ले जातात. त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ या. त्याविषयी माहिती देणारं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे. पाण्यात भिजवलेले अक्रोड खाणं आरोग्यासाठी हितावह आहे. ओल्या अक्रोडातून मिळणारी पोषणतत्त्वं कोरड्या अक्रोडापेक्षा अधिक आहेत. यासाठी रोज रात्री अक्रोड पाण्यात घालून ठेवावेत. सकाळी उठल्यावर हे अक्रोड खाल्ल्यास तब्येतीसाठी उपकारक ठरतं. दररोज 2 ते 4 भिजलेले किंवा ओले अक्रोड तुम्ही खाऊ शकता. यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर राहतात. परिणामी, शरीर निरोगी राहतं. हेही वाचा - Skin Care : चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्स कसे कमी करायचे? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम मेटाबॉलिझमध्ये होते वाढ मेटाबॉलिझम म्हणजे शरीरातलं चयापचय कार्य. अक्रोड खाण्याने हे कार्य सुधारतं. अक्रोडामध्ये आयर्न, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम यांचं प्रमाण प्रचंड आहे. वजनवाढीच्या समस्येवर अक्रोड खाणं हा चांगला उपाय ठरू शकतो. यामुळे वजनवाढ नियंत्रणात राहते. केसांसाठी उपयुक्त त्वचा आणि तब्येतीचीच नाही, तर केसांचीही निगा राखण्याचं काम अक्रोड उत्तम करतात. अक्रोड खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होते. तसंच हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. हाडं राहतील मजबूत अक्रोडामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या खनिजांचं प्रमाण खूप आहे. पाण्यात भिजवलेले अक्रोड आहारात नियमितपणे घेतल्यास हाडांच्या समस्या दूर राहतात. हाडांची होणारी झीज थांबते. म्हातारपण दूर म्हातारपण कोणाला चुकलेलं नाही; मात्र ते लांबवता येणं शक्य आहे. त्या उद्देशाने डाएट पाळणार्यांना अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तब्येत चांगली राहते. अतिकष्टामुळे अकाली म्हातारपण येऊ शकतं, ती समस्या यामुळे दूर होऊ शकते. तसंच अक्रोड त्वचेची तकाकी टिकवून ठेवतात. त्वचेसाठी अतिशय गुणकारी पाण्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. त्यामुळे त्वचेची चांगली निगा राखली जाते. तसंच त्वचा उजळण्यासही ते प्रभावी ठरतात. स्मरणशक्ती वाढते अक्रोड उत्तम पोषणतत्त्वांचा स्रोत आहे. यामुळे अक्रोड खाणं बुद्धी तल्लख होण्यास चांगलं आहे. पाण्यात भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने कामातली एकाग्रता वाढते. तसंच स्मरणशक्तीही चांगली राहते.
उत्तम आणि सकस आहार हे निरोगी जीवनाचं रहस्य आहे. सुका मेवा खाल्ल्याने तब्येत तंदुरुस्त राहते; पण सुकामेवा आहारात घेताना तो योग्य प्रमाणात घेणं जास्त हिताचं आहे. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं.