बीजिंग, 22 ऑक्टोबर : कोरोना महासाथीत (Covid-19 Pandemic) चीन आणि अमेरिकेतील (China and America) तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देश एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशात आता चीनमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना एका अज्ञात आजाराने विळखा घातल्याची बातमी समोर येते आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये असेलल्या अमेरिकन अधिकाऱ्यांना अज्ञात आजाराने विळखा घातला आहे. या आजारामुळे कुणाची स्मृती जात आहे, तर कुणाच्या नाकातून रक्त आहे.
चीनच्या ग्वांगझूमध्ये अमेरिकी परराष्ट्र विभागात कार्यरत असलेले मार्क लेनजी आणि त्यांच्या पत्नी-मुलांना विचित्र समस्या उद्भवली आहे. लेनजी यांना एके रात्री झोपेतून अचानक जाग आली आणि त्यांच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याच रात्री त्यांच्या मुलांच्या नाकातून रक्त वाहू लागलं. सुरुवातीला लेनजी यांना वाटलं प्रदूषणामुळे असं होत असावं, मात्र काही कालावधीनंतर त्यांना आपली स्मृती कमजोर होत असल्याचं लक्षात आलं.
रिपोर्टनुसार अशा समस्यांचा सामना करणारे लेनजी पहिले अमेरिकन अधिकारी नाही. 2018 सालापासून आतापर्यंत जवळपास 12 अधिकारी या अज्ञात आजाराचे शिकार झाले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानेदेखील याला गांभीर्याने घेतलं आहे. प्रशासनाच्या मते असं फक्त चीनमध्येच नाही तर रशिया आणि क्युबामध्येदेखील होतं आहे. जिथं फक्त अमेरिकन अधिकारी अज्ञात आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. क्युबामध्ये 2017 साली 20 अमेरिकन अधिकाऱ्यांना असा आजार झाला होता.
हे वाचा - भारताच्या Dr Reddy's वर सायबर अटॅक; रशियन लशीच्या ट्रायलला मंजुरी मिळताच अडचण
दरम्यान या प्रकरणी चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. चीन नेहमी आपल्यावरील आरोपांना तात्काळ उत्तरं देतं मात्र आता चीननं मौन बाळगलं आहे. अधिकाऱ्यांना असा आजार होणं म्हणजे चीनचं षडयंत्र असल्याचंही बोललं जातं आहे. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असं असताना चीनमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना अशा अज्ञात आजाराने विळखा घातला आहे.