परदेशात प्रवास प्लॅन करत आहात? नव्या Corona नियमांबद्दल आधी हे जाणून घ्या

परदेशात प्रवास प्लॅन करत आहात? नव्या Corona नियमांबद्दल आधी हे जाणून घ्या

अनेक देशांमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे, अधिक कडक नियम (Covid-19 guidelines) घालण्यात आले आहेत. विमान प्रवास करण्यापूर्वी तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...

  • Share this:

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (UK) नव्यानं आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे (Corona Virus mutation) जगभरात चिंतेचं सावट पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही (India)ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवा थांबवण्यात आल्या आहेत. एअर इंडिया (Air India), विस्तारा (Vistara), ब्रिटीश एअरवेज (British Airways) आणि व्हर्जिन अटलांटिक (Virgin Atlantic) यांच्या ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानफेऱ्या 22 डिसेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतर अनेक देशांमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे, अधिक कडक नियम (Covid-19 guidelines or coronavirus rules) घालण्यात आले आहेत.

पुढे किती काळासाठी ही बंदी घालण्यात येईल याची कल्पना नसल्यानं ब्रिटनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी मिळेल त्या विमानानं लवकरात लवकर भारतात येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात परत आल्यावर कोणत्या टेस्ट कराव्या लागतील, क्वारंटाईन (Quarantine) व्हावं लागेल, असे अनेक प्रश्न प्रवाशांना सतावत आहेत. विमान प्रवास करण्यापूर्वी तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...

तात्काळ काय केलं पाहिजे ?

22 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून विमानांवरील बंदी सुरू होणार आहे. त्यामुळे तुमचं विमान 22 तारखेचं असेल तर काळजीचं कारण नाही. अर्थात विमानाची वेळ आधी तपासून घ्या. एअर इंडिया, विस्तारा, ब्रिटीश एअरवेज आणि व्हर्जिन अटलांटीक यांनी आपल्या विमानांच्या वेळापत्रकात बदल केलेला असू शकतो, त्याची खात्री करून घ्या.

तुमचं विमान 23 तारखेला असेल तर?

तत्काळ विमान कंपनीशी संपर्क साधा आणि 22 तारखेचं विमान मिळतेय का याची चौकशी करा. मिळेल त्या ठिकाणाचे विमान घ्या. तुमचं बुकिंग दिल्लीचं असेल आणि अमृतसर, कोची, किंवा अहमदाबादचं तिकीट मिळत असेल तर ते घ्या. एअर इंडियाची विमानसेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. एकदा तुम्ही भारतात पोहोचलात की देशांतर्गत विमानांनी तुमच्या इच्छित स्थळी पोहचू शकता.

ब्रिटनमधून जर्मनी, फ्रान्सला जाऊन तिथून भारतात येता येईल का?  

दुर्दैवाने नाही. भारत सरकारनं ब्रिटनमधून दुसऱ्या ठिकाणी जावून तिथून भारतात येण्यास मनाई घातली आहे.

भारतात येण्यापूर्वी कोणत्या बाबींची तयारी ठेवली पाहिजे?

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना भारतात आल्यावर आरटी पीसीआर (RTPCR) चाचणी करून घ्यावी लागणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळल्यास सरकारनं जारी केलेल्या नियमांनुसार क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. याचा सगळा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे.

इंडिगो (INDIGO) विमान कंपनीनं यासंदर्भात एक माहितीपर पुस्तिका तयार केली आहे. ती जवळ ठेवा. उदाहरणार्थ, मुंबई विमानतळावर मध्यपूर्वेतील देश आणि युरोपियन देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक आहे. आल्यावर तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करणं आवश्यक नसून ती पाचव्या किंवा सातव्या दिवशी केली तर चालणार आहे. यात निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनमधून बाहेर सोडण्यात येईल. पॉझिटिव्ह आढळल्यास 14 दिवस हॉटेल किंवा हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

ब्रिटनमधून येण्यास कनेक्टिंग विमानसेवा आहेत का?

नाही. एअरबबल करारामुळं थेट ब्रिटनमधून भारतात येण्यासाठी सरकार विमानसेवा उपलब्ध करते, मात्र ब्रिटनमधून आफ्रिका, चीन अशा दुसऱ्या देशात जावून तिथून येण्यास संधी नाही.

विमान रद्द झाल्यास तिकीटाचं काय?

आता एअर इंडिया आणि विस्तारा यांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत कोणतेही चार्जेस न लावता जुन्या तिकीटावर प्रवास करण्याची सवलत दिली आहे.

रिफंडचे काय नियम आहेत?

इंडिगोनं कुवेतमधून येणाऱ्या विमानांसाठी रिफंडची (Refund) सुविधा दिली आहे. ब्रिटनमधील विमानासाठी मात्र ही सुविधा असल्याची माहिती नाही. एअर इंडिया आणि विस्तारा यांनीही रिफंड बाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे, मात्र 90 दिवसात रिफंड देण्याची सुविधा या कंपन्या देण्याची शक्यता असल्याचं या क्षेत्रातील सूत्रांनी म्हटलं आहे. ब्रिटीश एअरवेज आणि व्हर्जिन अटलांटीकनं थेट त्यांच्याकडून बुकिंग केलेल्या प्रवाशांना रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हर्जिन अटलांटीकनं 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्याच तिकीटावर प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

First published: December 22, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या