ताप, खोकलाच नव्हे तर मानसिक गोंधळ उडणं हेही आहे कोरोनाचं प्राथमिक लक्षण

ताप, खोकलाच नव्हे तर मानसिक गोंधळ उडणं हेही आहे कोरोनाचं प्राथमिक लक्षण

फुफ्फुसच नाही तर कोरोनाव्हायरस (coronavirus) मेंदूवरही (brain) परिणाम करतो आणि त्याची मानसिक लक्षणं दिसू लागतात.

  • Share this:

माद्रिद, 05 नोव्हेंबर : ताप, खोकला ही कोरोनाव्हायरसची (coronavirus) सर्वसामान्य आणि सुरुवातीची लक्षणं मात्र. याशिवाय तोंडाची चव जाणं, वास न येणं ही लक्षणंही कोरोनाची (coronavirus symptoms) आहे. मात्र आता त्यात मानसिक लक्षणांचीही भर पडली आहे. मानसिक किंवा मनाचा गोंधळ होणं  (mental confusion) हे कोरोनाचं प्राथमिक लक्षण असल्याचं एका संशोधनात दिसून आलं आहे.

क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोथेरपी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार काही कोरोना रुग्णांमध्ये डेलीरियम (Delirium) देखील आढळून येत आहे. डेलीरियम म्हणजे मेंदूत अचानक बदल होणे. यामुळे मानसिक गोंधळ उडतो. व्यक्तीच्या विचार करण्यावर, स्मरणशक्तीवर, झोपण्यावर आणि अनेक गोष्टींवर होतो.

संशोधनात वैज्ञानिकांनी कोविड-19 चा मानवी मेंदू संस्थेवर होणारा परिणाम या विषयी झालेल्या विविध अभ्यासांचा अभ्यास केला. चीनमध्ये जेव्हा कोरोनाव्हायरसची प्रकरणं आढळली तेव्हा कोरोना फुफ्फुसं, मूत्रपिंड आणि हृदयासारख्या इतर अवयवांवर होत असल्याचं दिसून आलं होतं. आता कोविडचा परिणाम मेंदू संस्थेवर तसंच मानसिकतेवर होत असून त्याच्या परिणामांमध्ये डोकेदुखी आणि डेलीरियमचा समावेश आहे.

हे वाचा - मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत खूशखबर; मोदी सरकार COVAXIN लाँच करण्याच्या तयारीत

स्पेनच्या युनिव्हर्सिटी ओबर्टा डे कॅटलुनियामधील संशोधक जेव्हियर कॉरिया यांनी सांगितलं, "तीव्र ताप येण्याबरोबरच अशाच प्रकारची लक्षणं ही या आजाराची प्राथमिक लक्षणं असतात. विशेषकरून जास्त वयाच्या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळून येतात. याचबरोबर आपल्याला सावध राहणं देखील आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  विशेषत: यासारख्या साथीच्या आजाराच्या काळात अशा लक्षणांवर बारीक लक्ष असायला हवं कारण ते कोविडचंही लक्षण आहे"

कोरोनाव्हायरस मेंदूवर कसा परिणाम करतो याची मुख्यतः तीन कारणं आहेत. यामध्ये  हायपोक्सिया किंवा मेंदूला ऑक्सिजनचा कमी पुरवठा कमी होतो, सायटोकीन स्टॉर्ममुळे मेंदूच्या पेशींमध्ये जळजळ होते. तसंच विषाणूमध्ये इतकी शक्ती आहे की तो रक्त आणि मेंदूमध्ये असलेले अडथळे पार करून थेट मेंदूत शिरू शकतो, असं संशोधक जेव्हियर कॉरिया यांनी सांगितंल. या तीन कारणांपैकी कोणत्याही एका कारणामुळे डेलीरियमसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले.

हे वाचा - चिंताजनक! ज्या वयोगटात सर्वात कमी कोरोना संक्रमण त्यांच्यामार्फतच पसरतोय व्हायरस

गेल्या महिन्यात, एज आणि एजिंग या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातही वयोवृद्ध लोकांमध्ये डेलीरियम हे कोरोनाचे प्रमुख लक्षण असल्याचं दिसून आलं आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, अवयवांतील जळजळ आणि हायपॉक्सियामुळे  डिलीरियम, कोंजिटिव्ह डिफिसिटस आणि वर्तणुकीशी संबंधित विसंगती निर्माण होऊ शकते.

Published by: Priya Lad
First published: November 5, 2020, 10:40 PM IST

ताज्या बातम्या