मुंबई, 23 सप्टेंबर : अनेक सेलिब्रिटींना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. आता अभिनेत्री श्वेता तिवारीचाही (Shweta Tiwari) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. श्वेतामध्ये सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे तिनं स्वत:ला घरातच क्वारंटाइन केलं आहे. घरीच ती उपचार घेत आहे.
श्वेताची तब्येत ठीक नसल्याची बातमी समोर आली. त्यानंतर तिला कोरोना झाल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर श्वेताने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हो मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझा कोव्हिड-19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती श्वेताने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.
श्वेताने सांगितलं, "मला 16 सप्टेंबरला खोकला सुरू झाला. टोनी आणि दियाने मला सांगितलं की शोमध्ये वरुणसह लग्नाचा सीक्वेंस खूप गरजेचा आहे. तरी मी विचार केला की उगाच धोका नको म्हणून मी तात्काळ माझी कोरोना टेस्ट करून घेतली. मी 17 सप्टेंबरला टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. सुरुवातीचे तीन दिवस काही लक्षणं होती. आता मात्र मी ठिक आहे"
श्वेता पुढे म्हणाली, "माझ्याकडे पुरेशी रूम आहेत. त्यामुळे मी स्वत:ला घरातच क्वारंटाइन केलं आहे. पलकही सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत आहे. माझा मुलगा रेयांशला मी त्याच्या वडिलांकडे पाठवलं आहे. मी जास्तीत जास्त गरम पाणी पिते आहे. वेळ घालवण्यासाठी वाचन करते आहे. हा खूप कठीण वेळ आहे. सेटवरदेखील शूटिंग करणं अशक्य होतं आहे. आपण सर्वजण या महासाथीतून कधी बाहेर पडणार?"
27 सप्टेंबरला माझी पुन्हा टेस्ट होणार आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत मी स्वत:ला क्वारंटाइन ठेवणार आहे, असंही श्वेताने सांगितलं.
हे वाचा - आणखी एका मराठी अभिनेत्रीला कोरोना; 'अग्गंबाई सासूबाई'तील निवेदिता सराफ पॉझिटिव्ह
कोरोनाचं संक्रमण अधिक होऊ नये. म्हणून गेले काही महिने पूर्ण लॉकडाऊन होता. मात्र हळूहळू हा लॉकडाऊन शिथील करण्यात आला. हातात काम, रोजगार नसल्याने अनेकांवर आर्थिक संकटं ओढावली. कलाकार आणि शूटिंगमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनादेखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे काही अटी आणि नियमांसह शूटिंगला परवानगी देण्यात आली. सेटवरदेखील कोरोनापासून बचावासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला.
हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही देणार कोरोना लस; पुण्याच्या 'सीरम'कडून उत्पादन
मात्र आता चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे. यापुढे शूटिंगदरम्यान नियमांचं पालन होत नाही असं आढळून आल्यास शूटिंग बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. खोपकर यांनी मालिकांचे निर्माते आणि मनोरंजन वाहिन्यांच्या मालकांना एक पत्र लिहून हा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.