मुंबई, 23 सप्टेंबर : ‘आई माझी काळूबाई’पाठोपाठ आता आणखी एका मराठी मालिकेतील कलाकाराला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. अग्गंबाई सासूबाई (agga bai saasubai) मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Joshi-Saraf) यांना कोरोना झाल्याची माहिती मिळते आहे. निवेदिता यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केल्याचं समजतं आहे. निवेदिता यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजताच मालिकेच्या सेटवरील सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. इतर कलाकारांचीही चाचणी झाली. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक, आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान यांचाही कोरोना रिपोर्ट आला आहे. त्यांचा अहवाल नेगेटिव्ह असल्याचं समजतं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचं संक्रमण अधिक होऊ नये. म्हणून गेले काही महिने पूर्ण लॉकडाऊन होता. मात्र हळूहळू हा लॉकडाऊन शिथील करण्यात आला. हातात काम, रोजगार नसल्याने अनेकांवर आर्थिक संकटं ओढावली. कलाकार आणि शूटिंगमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनादेखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे काही अटी आणि नियमांसह शूटिंगला परवानगी देण्यात आली. सेटवरदेखील कोरोनापासून बचावासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला. हे वाचा - फक्त इंजेक्शन नाही तर नाकावाटेही देणार कोरोना लस; पुण्याच्या ‘सीरम’कडून उत्पादन मात्र आता चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे. यापुढे शूटिंगदरम्यान नियमांचं पालन होत नाही असं आढळून आल्यास शूटिंग बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. खोपकर यांनी मालिकांचे निर्माते आणि मनोरंजन वाहिन्यांच्या मालकांना एक पत्र लिहून हा इशारा दिला आहे. हे वाचा - Bigg Boss 14 च्या धमाकेदार प्रमोशनला सुरुवात, पाहा सलमानचा BTS VIDEO फक्त मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांच्या सेटवरही कोरोनाने शिरकाव केला. अनेक हिंदी टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर या मालिकांचं शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं. यापैकी काही कलाकारांनी कोरोनावर मातही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







