मुंबई, 7 सप्टेंबर: सोशल मीडियाची व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामशिवाय आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. अलीकडची तरूणाई तर सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. सोशल मीडियाचे काही फायदेही आहेत, परंतु त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर फसवणूक, बनावटगिरी आणि लैंगिक छळासाठीही होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक तरूण-तरूणी या फसवणूकीचे बळी पडत आहेत. परंतु योग्य काळजी घेऊन ही फसवणूक टाळणं गरजेचं आहे. विशेषत: महिला आणि तरुणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लैंगिक छळाच्या बळी ठरतात. अशा लोकांची कमी नाही जे संधी मिळताच त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू लागतात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत अशा काही महिला आणि पुरुषांच्या टोळ्या आहेत, ज्या कोणत्या ना कोणत्या व्यवसायाच्या किंवा व्यवहाराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. बनावट खाती असलेले बरेच लोक आहेत. फसवणूकीचे बळी ठरलेलं अनेक तरूण नैराश्येच्या गर्तेत सापडल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं सोशल मीडियाचा वापर करताना भावनिक होऊ नये. तरुण-तरुणींनी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
1.फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी किंवा पाठवण्यापूर्वी करा विचार-
कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नका किंवा फॉलो करू नका, मग ते फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम असो. जोपर्यंत तुम्हाला आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये काही म्युच्यूअल फ्रेंड्स नाहीत, अशा फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणं टाळावं. त्याचबरोबर ज्या व्यक्तीबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही अशा व्यक्तीच्या एक-दोन गोष्टींनी प्रभावित होऊन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे योग्य होणार नाही.
2. इनबॉक्समध्ये विनाकारण बोलणं टाळा-
फेसबुकवरील मेसेंजरमध्ये तरुणींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. चांगले लोक चांगले आहेत, ते गरजेपोटी मेसेंजरचा वापर करतात, पण बहुतांश महिला आणि मुलींना याचा खूप वाईट अनुभव येतो. लोक त्यांना अश्लील मेसेज पाठवतात. त्यामुळे मेसेंजरचा वापर मर्यादित करा.
3.सायबर गुन्हे विभागाला द्या माहिती-
जर तुम्हाला सोशल मीडियावर मेसेंजरमध्ये अश्लील संदेश, इमोजी, चित्र किंवा व्हिडिओ पाठवला गेला असेल, तर असे करणाऱ्यांना सायबर कायद्यांतर्गत शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा- लाइफ @25: तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?
4. अनोळखी लोकांना तुमचा मोबाईल नंबर देऊ नका-
तुमचा मोबाईल नंबर कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक वगळता कोणालाही देऊ नका. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर अनेक लोक मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअॅप नंबर मागतात. प्रत्येकजणच वाईट नसतो, मात्र तरीही तुमचा मोबाईल नंबर देणं टाळा. त्यामुळे सोशल मीडियावरील मैत्री तशीच राहू द्या. मोबाईल नंबर दिल्यानं तुमची समस्या वाढू शकते. विशेषत: महिलांना अधिक छळाला सामोरं जावं लागतं.
5. सोशल मीडियावरील आर्थिक व्यवहारांत अडकू नका-
तरुणांना आर्थिक विषयांची फारशी समज नसते. त्यामुळं अनेक आमिषं दाखवून त्यांची फसवणूक केली जाऊ शकते. सोशल मीडियावर असे अनेक लोक आहेत, जे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागतात. अशा प्रकरणांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. त्याच वेळी, जर कोणी बिझनेस प्लॅनमध्ये सामील होण्याबद्दल बोलत असेल तर सावधगिरी बाळगा. यामध्ये मोठी फसवणूक होऊ शकते. जर कोणी तुम्हाला परदेशातून भेटवस्तू पाठवण्याबद्दल बोलत असेल तर अशा मित्रापासून दूर व्हा. भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तुमची मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Digital prime time, Social media