नवी दिल्ली, 26 जुलै : हेल्दी राहण्यासाठी आहारासोबतच व्यायाम करायला हवा. व्यायाम म्हटला, की चालणं, जॉगिंग, कार्डिओ, योगा हेच डोळ्यांसमोर येतं. मात्र आणखी एक व्यायामाचा प्रकार सर्वांत हेल्दी आणि नियमित करण्यासारखा आहे. तो म्हणजे स्विमिंग (Swimming) अर्थात पोहणं. मात्र अनेक जण रोज हा व्यायाम करू शकत नाहीत. काही वेळा जवळपास स्विमिंग पूलचा अभाव किंवा काही वेळा पोहता न येणं ही कारणं असू शकतात. पोहणं ही शिकण्याची कला आहे. इतर व्यायाम तुलनेने लवकर शिकता येऊ शकतात. पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम (Full Body Exercise) होतो. निरोगी आरोग्याची ही गुरुकिल्ली म्हणता येईल. टाइम्स नाउ न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, सर्वसामान्य माणसानं दर आठवड्याला 150 मिनिटांचा नॉर्मल व्यायाम व 60 मिनिटांचा कष्टप्रद व्यायाम केला पाहिजे. हे साध्य करायचं असेल, तर पोहणं हा उत्तम व्यायाम आहे. शरीरातील स्नायू, हृदय व इतर अवयव अशा सर्वांनाच पोहण्यामुळे व्यायाम मिळतो. पोहणं शरीराची ताकद (Strength) वाढवतं. याव्यतिरिक्तही पोहण्याचे आणखी काही फायदे आहेत. त्याविषयी पाहू.
पोहण्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. यामुळे वजन कमी करणं (Weight Loss), ताकद वाढवणं, काम करण्याची क्षमता वाढवणं तसंच स्नायूंना आकार देणं (Toning) यासाठी मदत होते. रनिंग आणि सायकलिंगच्या तुलनेत एक तास पोहल्यानं अधिक कॅलरीज बर्न होतात. पाण्यामुळे स्नायूंना रेझिस्टन्स मिळतो व ते अधिक बळकट होतात.
पोटातील सततच्या अल्सरकडे दुर्लक्ष करू नका, कोलन कॅन्सरचीही असते शक्यता
सामान्य लोकांप्रमाणेच ज्यांना अर्थ्रायटीस, मल्टिपल स्क्लेरॉसिस (Multiple Sclerosis) असे आजार किंवा काही दुखणी असतील, त्यांनाही पोहणं लाभदायी ठरतं. तज्ज्ञांच्या मते, पोहण्यामुळे स्नायू आणि सांधेदुखी कमी होऊन दुखण्यात चांगली सुधारणा होते. ऑस्टिओआर्थ्रायटिस असलेल्या रुग्णांची स्विमिंग आणि सायकलिंगमुळे सांधेदुखी आणि ताठरपणा कमी झाला, तसंच शारीरिक चलनवलनातील अडचणी कमी झाल्या, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.
पोहण्यामुळे झोपेचं गणित (Improves Sleep Patterns) सुधारण्यासाठी मदत होते. ज्यांना झोप न येणं किंवा इन्सोम्निया असेल, त्यांनी पोहण्याचा व्यायाम नियमित करावा. पोहल्यामुळे मेंदूच्या स्नायूंना आराम मिळतो. शांत वाटतं. चांगली झोप लागते.
पोहण्यामुळे हृदय आणि फुप्फुसाचं कार्य सुरळीत राहतं. पोहण्याचा व्यायाम रक्तदाब कमी ठेवण्यास मदत करतो व फुप्फुसाला ऊर्जा मिळते. हृदय आणि पोहण्याच्या संबंधांबाबत आजवर अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. हार्ट अॅटक आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका पोहण्यामुळे कमी होतो असं त्यात सिद्ध झालं आहे.
कायम मानसिक ताण असणाऱ्यांसाठी पोहणं हा उत्तम व्यायाम आहे. यात स्नायूंना आराम मिळाल्यामुळे ताण कमी होतो. तसंच मेंदूची हायपर अॅक्टिव्हिटीही (Hyper Activity) कमी करण्यास मदत होते. पोहणं हा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित करण्याचा व्यायाम आहे. यामुळे भरपूर कॅलरीज कमी होतात. ठराविक वेगानं पोहल्यास एका तासात जवळपास 715 कॅलरी बर्न होतात. उन्हाळ्यात स्विमिंग करणं शरीराला थंडावा देतं, पण नियमित पोहण्यामुळे शरीरासोबतच मनालाही शांत वाटतं. थकवा आणि ताण दूर होतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन फिटनेस एक्सरसाईजेसमध्ये या व्यायामालाही स्थान दिलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Mental health