मुंबई, 10 नोव्हेंबर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं अनेकदा खूप कठीण होऊन जातं. लोक त्यांची नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामात इतके व्यग्र झाले आहेत की ते त्यांच्या शरीराचीदेखील नीट काळजी घेत नाहीत. आपल्या शरीरातील ऊर्जेच्या पातळीत दिवसभरात चढ-उतार होत असतो आणि या चढउताराचा आपण करत असलेल्या अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
आपल्या शरीरातील उर्जा कमी होण्यामध्ये शरीराची हालचाल, तणाव, झोपेच्या प्रमाणातील बदल किंवा आपण खात असलेल्या अन्नाची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा समावेश असू शकतो. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे का होत आहे आणि तो थकवा घालवण्यासाठी तुमच्या रुटीनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल आवश्यक आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. योग कोच राधिका गुप्ता यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अशा पाच गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्या तुमची ऊर्जा कमी करण्यास कारणीभूत ठरतात.
हेही वाचा - नावावर जाऊ नका, खूप फायद्याचे असतात ढेमसे; Weight Loss पासून BP पर्यंत अनेक समस्या करतं दूर
दारू पिणं
हल्ली टेन्शन येणं ही गोष्ट नवीन राहिलेली नाही. त्यामुळे अनेकदा लोक टेन्शन आल्यावर, तणाव जाणवल्यावर दारू पिणं सुरू करतात. दारू तुम्हाला काही काळ तणावापासून दूर ठेवू शकते, परंतु यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेचं खूप नुकसान होते. अल्कोहोल हे शरीरासाठी विषासारखे आहे आणि ते बाहेर काढण्यात शरीराची उर्जा खर्च होते. त्यामुळे दारू प्यायल्यानेही तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो, तुमची चिडचिड होऊ शकते.
निगेटिव्ह कंटेंट पाहणं
आपण कोणता कंटेंट पाहतो, याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यवर परिणाम होतो. कधीकधी त्रासदायक व बीभत्स कंटेंट पाहिल्यामुळेही आपल्या शरीराची उर्जा कमी होते. असा कंटेंट आपल्या मनाला ताण देतो. जेव्हा आपलं मन अशा कंटेंटमुळे विचलित होतं, तेव्हा शरीराला आधीच्या स्थितीत परत आणण्यासाठी बरीच एनर्जी खर्च होते.
खोटं बोलणं
जेव्हा आपण कोणाशी तरी खोटं बोलतो किंवा कोणत्याही प्रकारची बेईमानी करतो, तेव्हा आपल्या मनावर एक ओझं असतं आणि ते सहन करण्यासाठी किंवा खोटं लपवण्यासाठी आपल्या शरीराला सामान्य परिस्थितीपेक्षा जास्त ऊर्जा लागते. खोट्यासह जगणं, स्वतःचा बचाव करण्यासाठी आणखी खोट्या गोष्टी रचणं यामुळे आपली एनर्जी खर्च होते. त्यामुळे तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहण्यास सुरुवात करून स्वतःचं आरोग्य चांगलं करू शकता.
जास्त जेवणं
जेव्हा आपण जास्त व जड जेवण करतो, तेव्हा आपल्या शरीरातील उर्जेचा वापर जास्त होतो. छोले भटुरे खाल्ल्यानंतर कधीच धावायची इच्छा होत नाही, कारण हा पदार्थ जड असतो. जड पदार्थ आपली 70-80% ऊर्जा काढून घेतात आणि आपल्याला सुस्त वाटू लागतं. हे टाळण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खा.
आपल्या श्वासाची गती
आपल्या श्वासाच्या गतीचाही शरीराच्या ऊर्जेवर परिणाम होतो. जर तुम्ही वेगाने श्वास घेत असाल तर त्यामुळे जास्त ऊर्जा नष्ट होते. स्थिर आणि उच्च उर्जेसाठी हळू श्वास घेणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही रोज 10 मिनिटं प्राणायम केल्यास तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle