मुंबई, 12जानेवारी : अलीकडे हृदयविकार, डायबेटीसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे आजार होण्यामागं वेगवेगळी कारणं असतात. परंतु, सर्वसामान्यपणे बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, पोषक आहार आणि पुरेशा व्यायामाचा अभाव ही कारणं प्राधान्याने दिसून येतात. सध्याच्या काळात जीवन फार धावपळीचं झालं आहे. त्यामुळे अनेकांना या गोष्टींसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. कामाच्या ताणामुळे आहारावर लक्ष केंद्रित करणं अशक्य होतं. त्यामुळे साहजिकच पोषक आहाराऐवजी जंकफूडला प्राधान्य दिलं जातं; मात्र यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही सकारात्मक बदल केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. या बदलांविषयी सविस्तर जाणून घेऊ या. कामाचा ताण आणि धावपळीमुळे अनेकांना आहाराकडे लक्ष देता येत नाही. तसंच शरीर क्रियाशील राहण्यासाठी प्रयत्नदेखील करता येत नाहीत. अनेक जण जंक फूड खातात; मात्र यामुळे शरीराचं नुकसान होतं. गंभीर आजारांचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी संतुलित जीवनशैली आवश्यक आहे. लहान सवयींमध्ये बदल केल्यास जीवनशैली संतुलित राहू शकते. हेही वाचा - Winter Health Tips : आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहेत कारले, हिवाळ्यात नक्की खा नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्ही नवीन मित्र जोडू इच्छित असाल तर पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. नवीन वर्षात तुम्ही पाण्याशी मैत्री करा. दिवसभरात पुरेसं पाणी प्या. पाणी कमी प्यायल्यास शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. बद्धकोष्ठता, मायग्रेन यांसारख्या समस्या निर्माण होतात. पचनशक्ती कमकुवत होते, डिहायड्रेशनमुळे चेहऱ्यावरचा तजेला कमी होतो. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं. सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यावं. जेवणानंतर अर्ध्या तासानेस तसंच रात्री झोपण्यापूर्वी पुरेसं पाणी प्यावं. वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी जिमला जाणं शक्य होत नसेल किंवा व्यायामासाठी वेळ देता येत नसेल तर सकाळी लवकर उठून थोडा वेळा चालण्याचा व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. सकाळच्या ताज्या हवेमुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. संपूर्ण दिवस शरीर सक्रिय राहतं. हेही वाचा - हिवाळा असला तरी ‘या’ लोकांनी अजिबात खाऊ नये लसूण, नाहीतर वाढतील अनेक समस्या जेवणातल्या पदार्थांमध्येही थोडा बदल करणं गरजेचं आहे. भात, ब्रेड किंवा पिझ्झा याऐवजी भाज्यांचा आहारात समावेश करा. शिजवलेल्या भाज्या, ओट्स आहारात समाविष्ट करून बघा. यामुळे तुमचा मूड चांगला होईल आणि वजनही नियंत्रणात राहील. भाज्या हा बहुतांश शारीरिक समस्यांवरचा रामबाण उपाय आहे. आहारात कोणत्या पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करता, याचा हिशोब नवीन वर्षात एका डायरीत लिहून ठेवण्यास सुरुवात करा. आहारात फक्त जंक फूड, कोल्ड्रिंक नसतील याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे आहारात फायबर, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजयुक्त पदार्थांचा समावेश करा. एखाद्या दिवशी भात खात, एखाद्या दिवशी भाज्या किंवा ओट्स खा, एक दिवस आहारात भरडधान्याची भाकरी असू द्या. आहारात कधी तरी ज्यूस किंवा टोन्ड दुधाची लस्सी समाविष्ट करा. तुम्हाला सूप आवडत असेल तर ते घ्या. एकूणच डाएटमध्ये वैविध्य असेल तर तुमचा मूड आणि आरोग्य चांगलं राहील. दिवसभर धावपळ करूनही रात्री शांत झोप येत नसेल, तर अशा धावपळीचा उपयोग काय? बहुतांश शारीरिक समस्यांचं मूळ कमी झोप घेण्यात आहे. त्यामुळे झोपेचं वेळापत्रक तयार करा. आठ तास शांत झोप घ्या. जगाने काहीही म्हटलं तरी झोपेत कोणतीही तडजोड करू नका. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीर चांगलं राहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.