कोल्हापूर, 9 मे : आजही अनेक ठिकाणी पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहासमोर त्याच्या पत्नीला विधवा केलं जातं. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, तिला पांढरी साडी नेसवली जातं. यापुढेही तिला कोणतंही आभूषण घालण्यास बंदी घातली जाते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (Kolhapur News) गावाने महाराष्ट्राला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने हेरवाडचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो. हेरवाडकरांचा हा निर्णय सर्वांसाठी क्रांतिकारक आहे.
विधवांना सन्मानाने जगता यायला हवं, संविधानाने सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला आहे. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर महिलेने हा सर्व त्रास का सहन करायचा? याच विचारातून हेरवाडच्या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक महिलेला आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे. पतीचा मृत्यू झाला तरी तिला जगणं थांबवता येत नाही. अशावेळी तिच्यावर बंधन लावण्यापेक्षा तिला समाजातील सामावून घेणे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Kolhapur