Belgaon Loksabha Election भाजपचे कमळ फुलले खरे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीनं फोडला होता घाम

Belgaon Loksabha Election भाजपचे कमळ फुलले खरे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीनं फोडला होता घाम

संपू्र्ण देशात रविवार पश्चिम बंगाल निवडणुकीच्या चर्चेत गेला. पण महाराष्ट्रात मात्र चर्चा होती ती राज्याच्या सीमेवरील एका पोटनिवडणुकीची. ती निवडणूक म्हणजे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक.

  • Share this:

बेळगाव, 2 मे : संपू्र्ण देशात रविवार पश्चिम बंगाल निवडणुकीच्या चर्चेत गेला. पण महाराष्ट्रात मात्र चर्चा होती ती राज्याच्या सीमेवरील एका पोटनिवडणुकीची. ती निवडणूक म्हणजे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. या निवडणुकीत भाजपनं सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे सतीश जारकीहोळी. या दोघांमध्ये काट्याची टक्कर होती पण त्यांना घाम फोडला तो महाराष्ट्र एकीकरण समितीचे तगडे उमेदवार शुभम शेळके यांनी.

राष्ट्रीय पक्ष वारंवार महाराष्ट्र एकिकरण समितीचं अस्तित्व संपल्याचा दावा करतात. समितीत असलेल्या गटबाजीवर टीका होते. पण महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषकांनी या निवडणुकीत त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम यांनी तब्बल सव्वा लाख मतं घेतली. त्यामुळं बेळगावसह सीमा भागात अजूनही महाराष्ट्र एकीकरण समितीचं मोठं अस्तित्व असल्याचं स्पष्ट झालं. याठिकाणी वीस वर्षांपासून भाजपचाच खासदार निवडून येतो. पण यावेळी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समितीनं भाजपसह काँग्रेसला तगडं आव्हान दिलं. त्यामुळं मंगला अंगडी यांचा अवघ्या 2900 मतांनी विजय झाला. तर सतीश जारकीहोळी यांनाही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.

हे ही वाचा-West Bengal निवडणुकीत पवारांचा अदृश्य हात! आव्हाडांच्या ट्विटनंतर नव्या चर्चा

रविवारी मतमोजणीत सुरुवातीपासून मंगला अंगडी आघाडीवर होत्या. पण नंतर पुन्हा सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या पाच फेऱ्या शिल्लक असेपर्यंत ते आघाडीवर होते. पण शेवटच्या तीन फेऱ्या शिल्लक असताना मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली आणि अवघ्या 2900 मतांनी विजय मिळवला. नेहमी लाखांमध्ये असलेली भाजची आघाडी अवघ्या 2900 वर आली. महाराष्ट्र एकीकरण समितीनं आव्हान उभं केल्यानं ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळं आगामी निवडणुकांतही समितीनं एकसंघ राहणं गरजेचं आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील बेळगावात प्रचारासाठी आले होते. याठिकाणी आरोप-प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळं या निवडणुकीकडं महाराष्ट्रासह कर्नाटकचं लक्ष लागलं होतं.

सीमाभागातील 865 गाव आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. मराठी आणि भगव्याची अस्मिता जपत मराठी माणूस आजही सीमाभागात कानडी जुलमी अत्याचार सहन करतोय. पण याच मराठी माणसाला आता महाराष्ट्र एकिकरण समिती एकाच छताखाली आणत आहे. त्यामुळं समितीतील नेत्यांनी एकी दाखवणं गरजेचं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 2, 2021, 11:54 PM IST
Tags: belgaumBJP

ताज्या बातम्या