मुंबई, 1 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये (Mumbai) 13 ऑक्टोबर 2020 या दिवशी तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द कराव्या लागल्या. मुंबई स्टॉक एक्सजेंच बंद पडले होते. मुंबईसह ठाणे आणि उपनगरातील अनेक उद्योगांचं यामुळे मोठं नुकसान झालं होतं. मुंबईतील या ‘ब्लॅक आऊट’चं चायनीज कनेक्शन (Chinese connection) समोर आलं आहे.
देशातील वीज पुरवठा (Power Supply) खंडित करण्याचा कट चीनी हॅकर्सनं (Chinese Hackers) आखला आहे. मुंबईमध्ये मागच्या वर्षी झालेलं ‘ब्लॅक आऊट’ हा या व्यापक कटाचा भाग होता, अशी माहिती एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. कमीत कमी 12 सरकारी संस्था या हॅकर्सचं टार्गेट असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पॉवर युटिलिटी आणि त्यासंबंधी काम करणाऱ्या सेंटर्सचा समावेश आहे.
'रेकॉर्डेड फ्युचर' या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनटीपीसी लिमिटेट, पाच विभागीय दाब वितरण सेंटर आणि दोन बंदरांवर या हॅकर्सनी यापूर्वी हल्ला केला होता, अशी माहिती या संस्थेनं दिली आहे.
‘पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात मागच्या वर्षी भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील बॉर्डरवर टेन्शन वाढले. याच काळात भारतामधील वीज क्षेत्रातील एका मोठ्या संस्थेला टार्गेट करण्यासाठी चीनी हॅकर्सनी एका विशेष सॉफ्टवेयरचा वापर केला,’ असे या संस्थेच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
(वाचा : Corona Vaccine मिळेपर्यंत 'हे करा आणि हे करू नका', गुगलनं सांगितला सुरक्षेचा मंत्र )
चीन सरकारचं पाठबळ
चीनी हॅकर्सचा हा सर्व उद्योग हा सरकारी पाठबळामुळेच सुरु आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या हॅकर्सच्या संघटना चीनची सुरक्षा एजन्सी, गुप्तचर संघटना आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) यांच्याशी संबंधित आहेत. भारतामधील वीज विभागासह संरक्षण आणि अनेक सरकारी विभाग यांचं टार्गेट आहेत, असा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India china, Mumbai