नवी दिल्ली, 27 जून : पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीनमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. दोन महिन्यापासून सुरू असलेला हा ताण सोडवण्यासाठी वेगवेगळ्या बैठकींचं आयोजन केलं जात आहे. मात्र बैठक आणि चर्चेतूनही चीन ऐकण्यासाठी तयार नसल्याचं दिसून आलं आहे. चर्चेत नमती भूमिका घेणारं चीन मात्र नंतर नवीन खेळी करत असल्याचं दिसत आहे. चीननं धोका दिल्यानं आता भारतही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. दोन्ही देशांमध्ये वारंवार संवाद होऊनही कोणताही ठाम निर्णय होऊ शकला नाही. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रश्न सोडवण्याचं काम सैन्य दलावर सोपवण्यात आलं आहे. चीनच्या कोणत्याही धाडसाला प्रतिसाद देण्यासाठी भारताने आपली सर्व शक्ती सीमेवर लावली आहे. त्यामुळे चीनला कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल अशी आशा आहे. याशिवाय अमेरिकाही आपल्या सैन्यातील काही तुकडी भारताच्या मदतीला पाठवत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला सरकारकडून पूर्ण निर्णय घेण्याची सूट देण्यात आली आहे. भारत चीनच्या कोणत्याही हालचालीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. यासाठी सीमेवरही मोठ्या संख्येने सैन्य पाठवले जात आहे. अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे. चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने (Indian Air force) लेह-लडाखमध्ये (leh-Ladakh) संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे. या युद्धाभ्यासात सुखोई 30MKI, चिनूक MI 17, या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. या भागातली भौगोलि परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव करणे सुरू आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.