कोरोना काळातही चीनची कुरघोडी सुरूच; मदतीचं आश्वासन देऊनही भारतात मेडिकल सप्लाय घेऊन येणारी विमानं रोखली

कोरोना काळातही चीनची कुरघोडी सुरूच; मदतीचं आश्वासन देऊनही भारतात मेडिकल सप्लाय घेऊन येणारी विमानं रोखली

चीननं भारतासाठीच्या आपल्या सर्व कार्गो मालवाहतूक विमानांचं उड्डाण पंधरा दिवसांसाठी स्थगित (China's Sichuan Airlines suspends cargo flights) केलं आहे. यामुळे, भारताला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि इतर मेडिकल सप्लाय मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 27 एप्रिल : भारतातील कोरोना (Coronavirus in India) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशात काही देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. चीननंदेखील भारताच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मात्र, एका हातानं मदत करत दुसरा हात खेचण्याचं कामही चीन करत असल्याचं चित्र आहे. चीनच्या सरकारी सिचुआन या एअरलाइन्सनं भारतासाठीच्या आपल्या सर्व कार्गो मालवाहतूक विमानांचं उड्डाण पंधरा दिवसांसाठी स्थगित (China's Sichuan Airlines suspends cargo flights) केलं आहे. यामुळे, भारताला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि इतर मेडिकल सप्लाय मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. चीननं कोरोनाचा वाढता प्रकोप पाहाता भारताला मदतीचं आश्वासन दिल्यानंतर हे पाऊल उचललं आहे.

चीनमधील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भारतात जाणाऱ्या कार्गो मालवाहतूक विमानांचं उड्डाण स्थगित करण्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले, की भारतातील कोरोनास्थितीवर चीन बारकाईनं नजर ठेवत आहे. या गंभीर स्थितीमध्ये भारतासोबत आमची सहानुभूती आहे. या कोरोनाविरोधातील लढाईत आम्ही भारताच्या मदतीसाठी तयार आहोत, हे आधीच सांगितलं आहे. दोन्ही पक्ष याबाबत चर्चाही करत आहेत.

सिचुआन एअरलाइन्सचा भाग असलेल्या सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मार्केटींग एजंटने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, विमान कंपनी शीआन दिल्लीसह सहा मार्गांवरील आपली मालवाहतूक स्थगित करत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात कंपनीने म्हटले आहे की, भारतातील कोरोना स्थितीमध्ये अचानक झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर बाहेरुन येणारा संक्रमणांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील पंधरा दिवसांसाठी उड्डाणं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकात म्हटलं गेलं आहे, की भारतीय मार्ग हा नेहमीच सिचुआन एअरलाइन्सचा मुख्य मार्ग आहे. या स्थगितीमुळे आमच्या कंपनीचे मोठे नुकसान होईल. या बदललेल्या परिस्थितीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ' पत्रानुसार, कंपनी येत्या 15 दिवसांत या निर्णयाचा आढावा घेईल

शांघाय येथील सिनो ग्लोबल लॉजिस्टिक या मालवाहतूक कंपनीचे सिद्धार्थ सिन्हा म्हणाले की, सिचुआन एअरलाईन्सच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील व्यावसायिकांना जलद ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी करण्यास व त्यांना भारतात पाठविण्यास अडथळा निर्माण होईल. ते म्हणाले की आता ही उपकरणे पाठवणे अधिक आव्हानात्मक असेल, त्यांना सिंगापूर व इतर देशांमार्फत विविध विमान कंपन्यांनी पाठवावे लागेल, ज्यामुळे या अत्यावश्यक उपकरणांच्या पुरवठ्यात विलंब होईल. . सिन्हा म्हणाले की, भारतातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय आश्चर्यकारक आहे. कारण, भारत जाणाऱ्या चालक दलातील कोणताही सदस्य बदलला जात नाही आणि तेच चालक विमान परत घेऊन येतात.

Published by: Kiran Pharate
First published: April 27, 2021, 8:56 AM IST

ताज्या बातम्या