मुंबई, 9 फेब्रुवारी- भारत आणि जपानसह अनेक देशांना चीन लक्ष्य करून या देशांत स्पाय बलून्स ऑपरेट करत असल्याची बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या सैन्याने देशातील संवेदनशील भागांत हवेत तरंगणारे स्पाय बलून्स खाली पाडल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. हे बलून्स चीनने लष्करी हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी पाठवले होते. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने एक संशयित स्पाय बलून खाली पाडला होता. यासाठी अमेरिकेने F-22 फायटर जेटची मदत घेतली होती. या संदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिलं आहे.
शनिवारी अटलांटिक महासागरातील दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्यावर एका लढाऊ विमानाने चीनचे पाळत ठेवणारे बलून खाली पाडले. त्यानंतर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारतासह आपल्या मित्रराष्ट्रांना याबद्दल माहिती दिली आहे.
(हे वाचा: VIDEO: 80 पेक्षा अधिक वर्षे जगतात या ठिकाणाचे लोक, काय आहे कारण?)
सोमवारी स्टेट डेप्युटी सेक्रेटरी वेंडी शर्मन यांनी सुमारे 40 दूतावासांतील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. चीनच्या दक्षिण किनार्यावरील हैनान प्रांतातून हे बलून सोडण्यात येतात. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान, फिलिपाइन्स आणि वेगाने प्रगती करणारे असे देश ज्यांचे चीनसोबत वाद आहेत, या सर्व देशांची चीन या स्पाय बलून्सच्या माध्यमातून हेरगिरी करत आहे. या माध्यमातून चीन या देशांच्या लष्करी संपत्तीची माहिती गोळा करत होता. ही माहिती वॉशिंग्टन पोस्टने संरक्षण आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतींच्या हवाल्याने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएलए म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुसेनेद्वारे काही प्रमाणात या एअरशिप संचालित केल्या जातात. आतापर्यंत पाच खंडांमध्ये असे स्पाय बलून्स पाहिले गेले आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"हे बलून्स PRC म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या बलून्स ताफ्याचा भाग आहेत. ते इतर देशांवर पाळत ठेवण्यासाठी विकसित केले गेले आहेत. या बलून्सनी इतर देशांच्या सार्वभौमत्वाचंदेखील उल्लंघन केलं आहे," असं एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
हवाई, फ्लोरिडा, टेक्सास आणि ग्वाममध्ये गेल्या काही वर्षांत किमान चार बलून दिसल्याची नोंद झाली आहे. या चारपैकी तीन घटना ट्रम्प प्रशासनाच्या काळात घडल्या होत्या, पण ते चिनी बलून्स आहेत हे आताच लक्षात आलं आहे. गेल्या आठवड्यात दिसलेला बलून ही पाचवी घटना आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. पेंटागॉनने मंगळवारी आकाशात अतिउच्च स्तरावर पाळत ठेवणाऱ्या बलून्सचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, International, Lokmat news 18