नवी दिल्ली, 9 जुलै : गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीने जगभर थैमान घातलं आहे. त्याच्या उगमाचा आणि फैलावाचा अभ्यास सर्वत्र सुरू आहे. तसंच या पार्श्वभूमीवर अन्य कोणत्या विषाणूंपासून भविष्यात मानवात मोठी साथ येऊ शकते, याचाही अंदाज शास्त्रज्ञ बांधत आहेत. त्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) समावेश असू शकतो, असं शास्त्रज्ञांना वाटतं आहे.
डासांपासून फैलाव होणाऱ्या या विषाणूचे काही रुग्ण भारतात केरळ राज्यात आढळले आहेत. तिथल्या 19 व्यक्तींचे नमुने पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेकडे (NIO) पाठवण्यात आले असून, त्यापैकी किमान 13 जणांना झिका व्हायरसचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 'आज तक'ने या विषाणूबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.
कोरोनाचा (Corona) प्रसार चीनमधल्या लॅबमधून झाल्याची एक थेअरी असली, तरी सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार कोरोना या वटवाघळांमधल्या विषाणूचा संसर्ग मानवात होऊन त्याने गंभीर रूप धारण केल्याचं अनेक शास्त्रज्ञ मानतात. यापूर्वीही स्वाइन फ्लूचा प्रसार डुकरांमधून माणसात झाला होता. अशा प्रकारच्या झूनॉटिक अर्थात जनावरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने शास्त्रज्ञांचा त्यावर आधीपासूनच अभ्यास सुरू होता. कोविड-19मुळे त्या अभ्यासाला गती मिळाली; मात्र अभ्यासाची सुरुवात फार पूर्वीच झाली होती. आतापर्यंत जनावरांतून अनेक विषाणू माणसात आले आणि मारलेही गेले.
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
आता जगात सध्या अस्तित्वात असलेल्या 887 झूनॉटिक व्हायरसची (Zoonotic Viruses) यादी एका वेब बेस्ड प्लॅटफॉर्मने तयार केली आहे. त्यातल्या 30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका होऊ शकतो आणि त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधल्या (University of California) संसर्गजन्य रोग (Contagious diseases) तज्ज्ञ जोना मॅजेट यांनी 10 वर्षांहून अधिक काळ परिश्रम करून आणि जगभरातल्या तज्ज्ञांच्या साह्याने हे संशोधन केलं आहे. या संशोधनातूनच माणसासाठी घातक ठरू शकतील, अशा 30 विषाणूंची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी काही विषाणूंमध्ये महामारी अर्थात जागतिक साथ पसरवण्याची ताकद असल्याचं जोना मॅजेट यांचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वीच्या या संशोधनानंतर ब्राझीलमधल्या बायोलॉजिस्ट मार्सेला गोर्डो यांनी अंदाज वर्तवला होता, की आगामी संभाव्य महामारी झिका व्हायरसमुळेही होऊ शकते. अलेक्झांड्रा नावा या अन्य एका शास्त्रज्ञांनीही त्यांच्याशी सहमती व्यक्त केली होती. माणूस जंगलांवर अतिक्रमण करत चालला असल्यामुळे जंगली प्राण्यांमध्ये असलेले जिवाणू, विषाणू आणि अन्य सूक्ष्मजीव माणसात पसरू शकतात, असं शास्त्रज्ञ म्हणतात.
ब्राझीलमधल्या माकडांमध्येही झिका आणि चिकनगुनिया विषाणू आझळले आहेत. माणसातून हा संसर्ग माकडांना झाला होता. त्यामुळे अनेक माकडिणींचा गर्भपात करावा लागला होता. एडीस जातीच्या डासांपासून हा विषाणू पसरतो. माकडांना चावलेले डास माणसांनाही चावले की विषाणू पसरू शकतो.
कडकनाथच्या नावानं चांगभलं! कोरोना काळात रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा
झिका व्हायरस सर्वप्रथम कुठे आढळला?
झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महामारी घोषित केलं होतं.
हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.
झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत. मार्च 2016पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.
राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती
ओरोपाउच वायरस (Oropouche Virus) या कमी ज्ञात असलेल्या विषाणूवरही अलेक्झांड्रा आणि अन्य शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये आतापर्यंत 30वेळा महामारी आली असून, पाच लाख लोकांना लागण झाली आहे. तोही डासापासूनच फैलावत आहे.
मायारो वायरस (Mayaro Virus) या दक्षिण अमेरिकेत पसरत असलेल्या विषाणूवरही ही टीम काम करत आहे. या सर्व विषाणूंच्या संसर्गाची लक्षणं डेंग्यूसारखीच असल्याने त्यांचं निदान करणं अवघड आहे.
भविष्यातल्या महामारीमध्ये अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, अँटीमायक्रोबियल अशा कोणत्याच प्रकारच्या औषधांचा उपयोग होणार नाही, असं अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे धोका अधिक वाढणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.