नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : जागतिक नेत्रदृष्टी दिन 2022 दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. डोळ्यांशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. म्हणूनच डोळ्यांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. डोळ्यांची नीट काळजी न घेतल्यास दृष्टी खराब होऊ शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये अंधत्वही येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांचे आजार आणि अंधत्व यांसारख्या समस्यांबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने काम करण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. जागतिक दृष्टी दिवस 2021 च्या यशानंतर आता जागतिक दृष्टी दिवस 2022 ची थीम देखील #LoveYourEyes आहे. डोळ्यांमध्ये किडे-धूळ जाऊ देऊ नका - अनेकदा किडे, चिलटे, धूळ अशा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यात जातात. त्यानंतर आपण डोळे चोळू लागतो. पण, हा चुकीचा मार्ग आहे. असे केल्याने तुमच्या डोळ्यात संसर्ग तर होऊ शकतोच पण डोळ्यांच्या स्नायूंनाही नुकसान होऊ शकते. यामुळे तुमची दृष्टीही कमकुवत होते. डोळे कसे स्वच्छ करावे - वेबएमडीच्या माहितीनुसार, डोळ्यात किडे-धूळ-चिलट काहीही गेलं तर ते काढताना डोळ्यात बोट घालण्यापूर्वी आणि नंतरही तुमचे हात स्वच्छ केले पाहिजेत. डोळे अतिशय नाजूक अवयव आहे, म्हणून आपण गरम पाणी वापरू नये. तुम्ही कोमट पाणी थंड पाण्याचा वापर करावा. डोळे साफ करणारे कापड पूर्णपणे स्वच्छ असावे. उपाय 1: डोळ्यात पाणी आणा - डोळ्यात काहीही गेल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यात पाणी यावं यासाठी प्रयत्न करा. यासाठी डोळे जास्त वेळ मिचकवा किंवा वरची पापणी हलकी ओढून पाणी आणण्याचा प्रयत्न करा किंवा सोबत कोणी असल्यास डोळ्यात हवेची फुंकर मारण्यास सांगा. या उपायांनी पाणी येऊ लागलं तर जे डोळ्यात गेलं आहे ते आपोआप बाहेर येऊ शकतं. दुसरा उपाय - डोळे धुणे डोळे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता. पण, लक्षात ठेवा की पाणी पूर्णपणे स्वच्छ असावे. तुम्ही वाहत्या पाण्याखाली काही काळ डोळे ठेवू शकता. त्यामुळे डोळे स्वच्छ होतील आणि त्यांना थंडावाही मिळेल. या उपायाने डोळ्यातून पाणी देखील येऊ शकते.
तिसरा उपाय - कापडाने पुसा जर तुमच्या डोळ्याच्या लेन्सवर कण अडकला असेल तर स्वच्छ कापड घ्या. मऊ कापड किंचित ओले करून हलक्या हाताने घाण स्वाइप करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की तुम्हाला कण पकडण्याची गरज नाही अन्यथा नख डोळ्याला इजा पोहचवू शकते. काय करू नये - डोळे चोळू नका डोळे स्वच्छ करताना कधीही चोळण्याची चूक करू नका. असे केल्याने घाण जास्त आत जातेच, शिवाय तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंनाही इजा होऊ शकते. हे वाचा - चांगल्या दृष्टीसाठी नियमित करा डोळ्यांचे हे व्यायाम, डोळे कायम राहतील निरोगी डॉक्टरांना कधी भेटायचे - डोळे स्वच्छ करण्याच्या वर नमूद केलेल्या पद्धतींनंतरही आराम मिळत नसेल किंवा डोळे उघडण्यास त्रास होत असेल तर लगेच नेत्ररोग तज्ज्ञांशी संपर्क साधा. याशिवाय दुखणे, डोळे लाल होणे, दिसण्यात त्रास होणे आदी त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जा.