मराठी बातम्या /बातम्या /heatlh /World Cancer Day: किडनी कॅन्सर कसा ओळखावा? डॉक्टरांनी सांगितली 10 लक्षणे

World Cancer Day: किडनी कॅन्सर कसा ओळखावा? डॉक्टरांनी सांगितली 10 लक्षणे

किडनी

किडनी

World Cancer Day: अनियमित जीवनशैली तसंच वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेकांना दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे. या आजारांमध्ये कॅन्सरचाही उल्लेख करावा लागेल. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर ते जीवावरही बेतू शकतं.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 4 फेब्रुवारी- अनियमित जीवनशैली तसंच वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेकांना दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे. या आजारांमध्ये कॅन्सरचाही उल्लेख करावा लागेल. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर ते जीवावरही बेतू शकतं. किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किडनीचा कॅन्सर असल्यास काही ठराविक लक्षणं दिसून येतात. याचं वेळीच निदान करणं आवश्यक असतं. किडनीच्या कॅन्सरवर तत्काळ उपचार न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. 4 फेब्रुवारी हा दिवस ‘वर्ल्ड कॅन्सर डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘नवभारत टाइम्स हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

    कॅन्सरवर मात करायची असल्यास शरीरात होणारे बदल आणि काही लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं असतं. बहुतांशी वेळा लघवीवाटे रक्त येणं हे किडनीच्या कॅन्सरचा पहिला संकेत मानला जातो. वास्तविक पाहता कॅन्सर झालेल्या व्यक्तीला बऱ्याचदा वेदना किंवा अस्वस्थता जाणवत नाही. परंतु, लघवीवाटे रक्त येत असेल तर रुग्णाने सतर्क होणं फार गरजेचं आहे. काही प्रकरणांमध्ये किडनीचा कॅन्सर झालेला असल्यास आणि लघवीवाटे रक्त येत असेल तर कुठलीही वेदना होत नाही तसंच दरवेळी लघवीमध्ये रक्त दिसेलच असंही नाही. लघवीची तपासणी केल्यानंतर किडनीच्या कॅन्सरचं निदान होतं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचायचं असल्यास याचं वेळीच निदान होणं गरजेचं आहे आणि तत्काळ उपचार करणंही आवश्यक आहे. किडनीचा कॅन्सरचे निदान आणि त्यानंतरचे उपचार यावर जयपूर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील कन्सल्टंट मेडिकल ऑन्कॉलॉजी विभागाचे डॉ. ललित शर्मा यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत.

    (हे वाचा: लघवीचा 'हा' रंगही असू शकतो मधुमेहाचे लक्षण, दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला)

    किडनीतील कॅन्सरची ही आहेत लक्षणं

    किडनीच्या कॅन्सरसह इतर कारणांमुळेही लघवीवाटे रक्त येऊ शकतं. यात प्रामुख्याने सिस्टाईटिस, यूटीआय, ब्लॅडर आणि प्रोटेस्ट कॅन्सर, रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा ओव्हरडोस, मुतखडा आणि प्रोटेस्ट तसेच ब्लॅडरच्या कॅन्सरचाही यात समावेश होतो. किडनीच्या भागात गाठ निर्माण होणं, थकवा जाणवणं, पार्श्वभागात वेदना, अस्वस्थ वाटू लागणं, भूक न लागणं, वजन झपाट्याने कमी होणं, हाडांमध्ये वेदना, हाय ब्लड प्रेशर, अॅनिमिया तसंच रक्तात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यास किडनीचा कॅन्सर असल्याचे संकेत मिळतात.

    किडनीचा कॅन्सर होण्याचं कारण काय आणि निदान कसं करावं?

    किडनीचा कॅन्सर होण्याचं विशिष्ट असं कारण सांगितलं जाऊ शकत नाही. परंतु धुम्रपान, स्थूलता, हाय ब्लड प्रेशर असल्यास किडनीचा कॅन्सर असण्याची शक्यता असते. या शिवाय अनुवंशिक आणि रेडिएशनच्या एक्सपोजरमुळे या कॅन्सरची शक्यता आहे. वर सांगितल्याप्रमाणे लक्षणं दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. कॅन्सरचं अचूक निदान व्हावं असं वाटत असल्यास लघवी, रक्त याची तपासणी, सिटीस्कॅन पोटाचा व पोटाचा एमआरआय तसंच ट्यूमरची बायोप्सी करावी लागते.

    किती गंभीर ठरू शकतो किडनीचा कॅन्सर?

    किडनीच्या कॅन्सरचं निदान कुठल्या टप्प्यावर झालं आहे यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत. लिम्फ नोड्सवर किती परिणाम झाला आहे, आजार किती पसरला आहे आणि कुठला अवयव आणि पेशींपर्यंत पोहोचला आहे, तसंच गाठीचा आकार किती आहे यावर कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे हे ठरवलं जातं. किडनीच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीचा पहिला आणि दुसरा टप्पा असतो. यात किडनीमध्ये ट्यूमर आढळून येतो. ट्यूमरच्या जवळपास असलेल्या संरचनेत जेव्हा कॅन्सर पोहोचतो तेव्हा तो किडनीच्या कॅन्सरचा तिसरा टप्पा मानला जातो. कॅन्सर जेव्हा किडनीच्या बाहेर इतर अवयवांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो चौथ्या टप्प्यात म्हणजेच ऍडव्हान्स लेव्हलवर पोहोचलेला असतो.

    किडनीच्या कॅन्सरवर कोणते आहेत उपचार?

    किडनीतील ट्यूमरची स्टेज आणि ग्रेड, रुग्णाचं वय आणि त्याचं आरोग्य यानुसार किडनीच्या कॅन्सरचे उपचार ठरतात. किडनीच्या कॅन्सरवर उपचाराचे अनेक पर्याय आहेत. यात सर्जरी टिश्यूंना कापून काढणं, रेडिएशन थेरेपी, टार्गेटेड मेडिकेशन थेरपी, इम्युनोथेरेपी आणि कधी कधी किमोथेरपीचा उपयोग यासाठी होऊ शकतो.

    किडनीचा कॅन्सर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी?

    कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सर होण्यामागे कारणंही वेगवेगळी असू शकतात. किडनीचा कॅन्सर होण्याची कारणं ही वेगळी असून याला रोखायचे असल्यास उपायही करता येऊ शकतात. किडनीच्या कॅन्सरपासून पूर्णपणे वाचता येत नाही. परंतु काही उपाय केल्यास याची जोखीम काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्यात प्रामुख्याने धूम्रपानाची सवय असल्यास ती सोडायला हवी. या शिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला हवे. आपलं वजन नियंत्रणात ठेवून फळं आणि भाजीपाला खाल्ल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. दरम्यान सर्वसामान्य माहितीच्या आधारावर या बाबी अवलंबून असल्या तरी कुठल्याही औषधाला हे पर्याय असू शकत नाही. त्यामुळे काही लक्षणं आढळून आल्यास डॉक्टरांशी तत्काळ संपर्क करणं आवश्यक असतं.

    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle