कॅनबेरा,27 जानेवारी : फळं-भाज्या असो वा मासे-मांस असे खाद्यपदार्थ शक्यतो आपण धुवूनच शिजवतो आणि तीच सवय चांगली. पण शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक ठरू शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे चिकन धुऊन घेण्याची सवय ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे. 'द कॉन्व्हर्सेशन'मधल्या एका अहवालानुसार, शिजवण्यापूर्वी कच्चं चिकन धुऊ नये, अशी शिफारस जगभरातले अन्न सुरक्षितता अधिकारी आणि नियामकांनी केली आहे. चिकन धुतल्याने किचनमध्ये धोकादायक जिवाणू पसरतात, त्यामुळे असं सांगितलं जात आहे. चिकन न धुता पूर्णपणे शिजवणं योग्य असून अशा पद्धतीनं बनवलेलं चिकन खाणं सर्वांत सुरक्षित मानलं जातं; पण ही गोष्ट किती जणांना माहिती आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात केल्या गेलेल्या नवीन संशोधनातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तथापि, हे तथ्य असूनही, चिकन धुऊन घेणं ही एक सामान्य प्रथा आहे. ऑस्ट्रेलियाच्या फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं, की ऑस्ट्रेलियातल्या जवळपास निम्म्या घरांमध्ये चिकन शिजवण्यापूर्वी ते धुऊन घेतात. 25 टक्के ग्राहक चिकन अनेकदा आणि नेहमी धुतात, असं डच संशोधनात आढळून आलं.
हे वाचा - पराठ्याच्या नावाने काहीही! VIDEO पाहून सांगा, आहे का असं काही खाण्याची तुमची तयारी?
मग असं का केलं जातं आणि चिकन धुण्याच्या जोखमीबद्दल संशोधन काय सांगतं? अन्नजन्य आजारांची दोन मुख्य कारणं म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेला हे बॅक्टेरिया अर्थात जिवाणू. हे सामान्यतः कच्च्या चिकनवर आढळतात. कच्चं चिकन धुतलं, तर हे जिवाणू किचनमध्ये सर्वत्र पसरतात आणि त्यामुळे रोगांचा धोका वाढतो.
ऑस्ट्रेलियात गेल्या दोन दशकांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर आणि साल्मोनेलाच्या केसेसचं प्रमाण जवळपास दुप्पट झालं आहे. कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाच्या दर वर्षी अंदाजे 2,20,000 केसेसपैकी 50,000 केसेस थेट किंवा अप्रत्यक्षपणे चिकनमुळे येतात. धुतलेल्या चिकनच्या पृष्ठभागावरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबावर अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनातून असं स्पष्ट होतं की हे खूप धोकादायक कृत्य आहे. चिकनच्या पृष्ठभागावरून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जिवाणू आसपासच्या पृष्ठभागावर स्थानांतरित होऊ शकतात, असं संशोधनात स्पष्टपणे दिसून आलं आहे.
हे वाचा - Yummy म्हणत Noodles वर ताव मारणाऱ्यांनो हा VIDEO पाहाच; पुन्हा खाण्याचा विचारही करणार नाही
हाय स्पीड इमेजिंगचा वापर केला असता, संशोधकांना असं आढळलं की उंचावरच्या नळातून उडणाऱ्या शिंतोड्यांमुळेही हे जिवाणू आजूबाजूला पसरतात. जिवाणूंच्या प्रसाराचं प्रमाण नळांची जास्त उंची आणि पाण्याच्या प्रवाहामुळे वाढतं. तसंच एरेटेड पाण्याच्या (नळ पूर्ण क्षमतेनं चालू नसताना पडणारं पाणी) शिंतोड्यांमुळेही जिवाणूंचा प्रसार वाढतो, असंही संशोधकांना दिसून आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.