नवी दिल्ली, 11 जानेवारी : कोरोना महामारीने जगाला अनेक अनुभव दिले. आपत्कालीन यंत्रणा सज्ज केल्या. आरोग्य व्यवस्था सुधारल्या. त्याचबरोबर कोरोनाने अनेकांना अनेक दुखणीही दिली. रक्तातल्या गुठळ्या, म्युकरमायकोसिस, डायबेटीस अशा काही समस्या जणांना जाणवू लागल्या. त्याचबरोबर आता कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांना अॅव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस किंवा ऑस्टिओनेक्रॉसिस हा आजार होत असल्याचं दिसत आहे. या आजारात रक्तपुरवठा न झाल्यानं हाडांमधल्या ऊती मरतात. शक्यतो हा आजार सांध्यांमध्ये होतो. या आजाराचं वाढलेलं प्रमाण कोरोनाशी निगडित असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे. कोरोनानंतर अनेक रुग्णांना म्युकरमायकॉसिस झाला. काही जणांना डायबेटीसची लक्षणं दिसली. काहींना हृदयाची दुखणी मागे लागली. आता त्यात अॅव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस (एव्हीएन) या आजाराची भर पडली आहे, असं फरिदाबादमधल्या मेट्रो रुग्णालयातले सल्लागार डॉ. उदित कपूर यांनी म्हटलं आहे. हा आजार सांध्यांमध्ये होतो. हिप जॉइंटला रक्तपुरवठा न झाल्याने हाडांमधल्या ऊती मरतात आणि त्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवते. या आजाराबाबत सारं वैद्यकीय क्षेत्र आश्चर्यचकित झालंय. हा आजार एका हाडाला किंवा अनेक हाडांना होऊ शकतो; मात्र बऱ्याचदा हाडांच्या शेवटी किंवा सांध्यांवर त्याचा परिणाम होतो, असं मिरा रोडच्या वोक्हार्ड्ट रुग्णालयातले कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स इन्ज्युरी स्पेशालिस्ट डॉ. सारंग देशपांडे यांनी सांगितलं. हा आजार होण्यासाठी रक्तपुरवठा थांबणं हे एक कारण आहे; मात्र त्याव्यतिरिक्त स्टेरॉFड्स, दारू आणि सिकल सेल डिसीज यामुळेही हा आजार होऊ शकतो. फ्रॅक्चर, सांधा निखळणं, कॅन्सरमधली रेडिएशन थेरपी यांमुळेही हा आजार होण्याची शक्यता असते. निश्चित सांगता येणार नाही, पण कोरोनाच्या उपचारांसाठी घेतलेल्या औषधांमुळे शरीरातला रक्तपुरवठा कमी झाल्याची शक्यता आहे, असं डॉ. कपूर यांचं मत आहे. याबाबत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं (AIIMS) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडे (ICMR) संशोधनासाठी परवानगी मागितली आहे. कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमधल्या एव्हीएन (AVN) आजाराबाबतच्या केसेसचा अभ्यास यात करण्यात येणार आहे. एव्हीएनची लक्षणं हा आजार असलेला रुग्ण नितंब किंवा मांडीच्या सांध्यात दुखत असल्याची तक्रार करतो. रुग्णाला चालणंही मुश्किल होतं. स्टेरॉइड हे त्याचं एक कारण आहे. स्टेरॉइड्स घेतल्यावर 3 आठवडे ते 3 महिने या कालावधीत कधीही हा आजार होऊ शकतो, असं नवी मुंबईतल्या अपोलो रुग्णालयातले संसर्गजन्य आजारांबाबतचे सल्लागार डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीच्या केसेस भारतात आतापर्यंत फारच कमी झालेल्या आहेत; मात्र हा आकडा कोरोनानंतर वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटतेय. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये 3 महिने ते एक वर्षापर्यंत कधीही या आजाराची लक्षणं दिसू शकतात, असं डॉ. देशपांडे यांचं म्हणणं आहे. कोरोनावरच्या उपचारांसाठी स्टेरॉइड्स देण्यात आली असतील, तर एव्हीएन आजाराची शक्यता वाढते, असं 2021च्या BMJ केस रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एव्हीएन होण्यासाठी प्रेडनीसोनसारख्या स्टोरॉइड्सचा 2000 mg इतका डोस कारणीभूत असतो, असं म्हटलं जातं; मात्र कोरोनामुळे थोड्या प्रमाणातल्या स्टेरॉइड्स डोसमुळेही एव्हीएन होण्याची शक्यता वाढली असं रिपोर्ट सांगतो. हेही वाचा - RBI च्या ‘ई-रुपी’च्या पायलट प्रकल्पात मुंबईतला फळविक्रेता, नेमकं काय होणार? या आजाराची लक्षणं लवकर ओळखल्यास वेळेत उपचार करता येतात. त्यामुळे दीर्घ काळ कोव्हिडचा सामना केलेल्या रुग्णांना वेळोवेळी नितंबांचा एमआरआय स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो, असं डॉ. जेस्सानी यांनी सांगितलं. लवकर निदान झाल्यास औषधोपचार घेता येतात; मात्र उशिरा निदान झाल्यास जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी हाच पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे एमआरआय करणं हे आजाराच्या निदानासाठी खूप महत्त्वाचं असतं. एव्हीएनची कारणं - हाडांची दुखापत करणारा एखादा अपघात - फ्रॅक्चर - रक्तवाहिन्यांची दुखापत - सिकल सेल डिसीज - एचआयव्ही - पॅन्क्रियाटायटिस - रेडिएशन आणि केमोथेरपी - ऑटोइम्युन परिस्थिती - कॉर्टिकोस्टेरॉइडचा दीर्घ वापर - रक्तातली वाढलेली चरबी कोव्हिडची दीर्घ काळ लक्षणं असलेल्या रुग्णांना दुखणं कमी व्हावं म्हणून डॉक्टर नियमित औषधं व 6 आठवडे फिजिओथेरपी करायचा सल्ला देतात. काही वेळा रुग्णांना कोलेस्टेरॉल जास्त असेल तर स्टॅटिन्ससारखी अँटी इन्फ्लमेटरी औषधंही घ्यावी लागू शकतात. लवकर निदान झालं नाही, तर मात्र शस्त्रक्रियेचाच पर्याय असतो. एव्हीएन या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी स्टेरॉइड्सचा जास्त वापर असलेले औषधोपचार टाळणं गरजेचं आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनीही वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.