आजारी असताना आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा सर्वप्रथम ते जीभ, डोळे तपासतात आणि हातांना दोन्ही बाजूंनी पाहतात. कारण तोंड, डोळे आणि हातांना पाहून अनेक आजारांच्या लक्षणांची माहिती मिळू शकते. हात थरथरत असतील, हाताची बोटं लाल झाली किंवा सुजली तर शारीरिक व्याधी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही बाब गांभीर्यानं घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आपले हात एखाद्या टूलप्रमाणे काम करतात. जेवण करणं असो अथवा एखादी वस्तू उचलणं प्रत्येक कामासाठी हातांचा वापर करावाच लागतो. त्यामुळे हाताशी निगडीत एखादी समस्या असेल तर त्याकडे निश्चितच दुर्लक्ष केलं जाऊ नये. हातांमध्ये होणाऱ्या बदलातून शरीरातील आजाराबद्दल माहिती मिळू शकते. हातांची बोटं लाल होणं आणि ती सुजली असतील तर हे अनेक आजारांचे संकेत असू शकतात, असं इंग्लंडच्या चेस्टर विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. गॅरेथ यांनी ‘डेली स्टार’ ला सांगितलं. 65 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना वॉटर रिटेंशन म्हणजेच बोटांमध्ये पाणी भरण्याची समस्या निर्माण होत असते. या शिवाय आर्थ्रायटिसमुळेही हाताची बोटं कठीण बनतात. बोटांवर सूज येते आणि वेदनाही व्हायला लागते.
(सायकल चालवण्याने रक्तातील साखर राहते नियंत्रित, या आजारांचा धोकाही होतो कमी)
हाँगकाँग येथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाल्या की, आजारांचा एखादा पुरावा मिळावा म्हणून डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते सर्वात आधी हात पाहतात. यातून शरीरातील आजाराबद्दलची माहिती मिळू शकते. हातात होणारे बदल नेहमीच गंभीर असत नाहीत. पण काही वेळा शरीरात एखादी गंभीर समस्या निर्माण झाली असेल तर त्याची माहिती हातांमध्ये झालेल्या बदलावरून समजू शकते. तर, काही वेळा वैद्यकीय स्थितीमुळे हातांवर परिणाम होऊ शकतो. यात प्रामुख्यानं शरीरात काही आजार असल्यास त्याचा परिणाम बोटांवर दिसतो, असे हाँगकाँगच्या मटिल्डा ऑर्थोपेडिक अँड स्पाईन सेंटरमधील ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमेटोलॉजीच्या तज्ज्ञ डॉ. एथेना एयू यांनी सांगितलं.
आजारांची लक्षणं हात आणि बोटांवर कशी आढळून येतात यावर त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. उदा. आर्थ्रायटिस या आजारात सांध्यांची हाडे कमकुवत होतात व सूज आणि वेदना कायम राहते. याशिवाय कार्पल टनल सिंड्रोममध्ये मनगटावरील मीडियन नर्व्ह दबून जाते. त्यामुळे संपूर्ण हाताला वेदना जाणवू लागतात. ट्रिगर फिंगर्स या स्थितीत बोटांतील टेंडनमध्ये काही कारणाने सूज निर्माण होते. टेंडनमध्ये झालेले नुकसान स्नायूपर्यंतही पोहोचते आणि वेदना होऊ लागतात व बोट सूजतात. ट्रिगर फिंगरची स्थिती निर्माण झाल्यास बोटं सांध्यांजवळ वाकलेली असतात. तसंच डी कर्वन सिंड्रोमची समस्याही तुम्हाला असू शकते. यात अंगठ्याच्या खाली व त्याच्या जवळपास सूज येते व वेदनाही जाणवू शकतात. क्युबिटल टनल सिंड्रोममध्ये अलनर नर्व्हमध्ये वेदना, सूज आणि जळजळ जाणवते. ती मानेच्या कोपाऱ्यापासून सुरू होते आणि बोटांपर्यंत पोहोचते. या व्यतिरिक्त ऑटो इम्युन आजार असलेल्या रूमेटाइड आर्थ्रायटिसमध्ये अंगठा आणि मनगटाचे सांध्यांवर परिणाम होऊ शकतो. तर डुप्युट्रेन या आजारात तळहाताच्या त्वचेखाली असणाऱ्या ऊतींच्या थरावर वाईट परिणाम होतो. याला फॅसिआ असंही म्हटलं जातं.
(लोकांना वेड लावणाऱ्या ग्रीन कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!)
गँगलियोन सिस्ट म्हणजे काय?
बोटं, हात आणि मनगटावर असणाऱ्या गाठीला नाडीग्रंथी पुटी (गँगलियोन सिस्ट) म्हणतात. उपचार केल्यानंतरही पुन्हा या समस्येचा सामना करावा लागू शकतो. गँगलियोन सिस्टमुळे सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. बोटांच्या सांध्यांमध्ये सूज येणे म्हणजे आर्थ्रायटिस, अक्यूट ट्रॉमा आणि जखम किंवा इन्फेक्शन असल्याचं दर्शवतं, असं डॉ. एथेना एयू म्हणतात. हातांमधील बदल किंवा समस्या हळूहळू वाढत जाऊन शरीरातील इतर अवयवांवर परिणाम करू शकतात. काही वेळा हात सून्न पडणे, जळजळ आणि बोटांमध्ये कमकुवतपणाही जाणवू शकतो. ही सर्व लक्षणं कार्पल टनल सिंड्रोम आणि क्युबिटल टनल सिंड्रोमचा इशारा देताता. बोटे सून्न पडणे पेरिफेरल न्यूरोपॅथीचेही एक कारण असल्याचं डॉ. एयूंनी सांगितलं.
हातांचं थरथरणं आजाराचं लक्षण
डॉ. एयू म्हणाल्या की, हात थरथरणं हे आजाराचं लक्षणं असू शकतं. यात पर्किसन्स, मल्टिपल स्केलेरोसिस, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता, थायरॉईड यांचा समावेश होतो. थायरॉईड आणि औषधांच्या साईड इफेक्टमुळेही हा थरथरण्याचा प्रकार जाणवू शकतो. हात थरथरण्याची समस्या असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असे डॉ. एयू यांनी सांगितलं.
बोटांना मुंग्या येणं धोकादायक
हाताची बोटं अनेकदा सुन्न पडतात किंवा बोटांना मुंग्या येतात. या स्थितीला रेनॉड डिसीज म्हटले जाते. या आजारामुळे शरीरातील हात-पायांसह इतर काही भागांना रक्तपुरवठा कमी होतो. बोटांवर सूज, गाठी येणं हे रूमेटाईड अर्थेरायटिस असण्याचे संकेत असू शकतात.त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
हातांची, बोटांची रचना समजून घेऊयात
शारीरिक आजारांची माहिती हात किंवा बोटांद्वारे समजते हे जाणून घेताना नेमकी आपल्या हाताची रचना कशी आहे हे समजून घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. मनगट, बोटं आणि अंगठा मिळून हात तयार होतो. हातात 27 प्रकारची हाडं असतात. यात 8 कार्पल बोन्स, बोटांच्या खालील बाजूस 5 मेटाकार्पल हाडं असतात. एका हातात 27 जॉइंट्स आणि 120 लिगामेंट्स असतात. लिगामेंट्सम हे एका दोरीप्रमाणे ऊती असतात जे हाडांना एकमेकांशी जोडतात. प्रत्येक हातात 30 स्नायू असतात. ब्लॅक म्हणाल्या की, टेंडन हे सॉफ्ट टिशू असतात. स्नायूंना हाडांशी जोडण्याचे काम टेंडनद्वारे केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.