मुंबई, 18 ऑगस्ट : गेल्या कित्येक दिवसांपासून कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात आहेत. हार्ट अटॅक आल्यानंतर 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता अधिक गंभीर झाल्याचं सांगितलं जातं आहे. राजू ब्रेनडेडच्या स्थितीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं वृत्त आलं होतं. पण आता त्यांचे मॅनेजर मकबूल यांनी श्रीवास्तव ब्रेनडेड असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. न्यूज 18 शी बोलताना ही अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. पण तरी ब्रेनडेड म्हणजे नेमकं काय याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
ब्रेनडेड या शब्दावरूनच तुम्हाला समजलं की मेंदू मृत होणं. पण एखाद्याचा मृत्यू होणं म्हणजे त्याचे हृदयाची धडधड थांबणं हे आपल्याला सामान्यपणे माहिती आहे. म्हणजे हृदय थांबलं तरच ती व्यक्ती मृत समजावी असं आपल्याला वाटतं. मग ब्रेनडेड झाल्याने कुणाचा मृत्यू कसा काय होतो?
वेब एमडीशी बोलताना क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट इसाक ताविल म्हणाले, हृदय आणि फुफ्फुस थांबलं की मृत्यू झाला असं अनेकांना वाटतं. पण जेव्हा मेंदूचं कार्य थांबतं तेव्हा मशीन्समार्फत या अवयवांचं काम सुरू राहतं. पण मेंदूच्या बाबतीत तसं होत नाही. मेंदूला गंभीर इजा होणं, मेंदूतील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचल्याने स्ट्रोक येणे किंवा हृदय बंद पडल्याने मेंदूला ऑक्सिजन आणि इतर आवश्यक घटकांचा पुरवठा न होणं यामुळे मेंदू मृत व्हायला सुरुवात होते, याला ब्रेनडेड म्हणतात.
हे वाचा - राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये Heart Attack, हृदयरोगतज्ज्ञांच्या या सूचनांकडे करू नका दुर्लक्ष
अशा रुग्णांचा मेंदू कार्य करणं थांबतो पण त्यांचं हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत असे अवयव काम करत असतात. फक्त हे रुग्ण स्वतःहून श्वासोच्छवास करू शकत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटर किंवा लाइफ सपोर्टवर ठेवलं जातं.
ताविल यांनी सांगितल्यानुसार, एखादा रुग्ण ब्रेनडेड आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णावर कमीत कमी तासभर लक्ष ठेवलं जातं. त्याच्या तोंडातून काही आवाज येतो का, त्याच्या डोळ्यांची हालचाल होते का ते पाहिलं जातं. त्याच्या त्वचेला चिमटा काढून त्याला काही वेदना होत आहेत का ते पाहिलं जातं. सर्वात शेवटी त्याचा कृत्रिम श्वासोच्छवास हटवला जातो आणि रक्तातील कार्बन डायॉक्साइड वाढल्याने मेंदूवर काही परिणाम होतो का ते पाहिलं जातं. यापैकी काहीच झालं नाही तर तो रुग्ण ब्रेनडेड असल्याचं ठरवलं जातं.
हे वाचा - काळजी घ्या! हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये 50 टक्के डायबेटिसचे रुग्ण
ब्रेनडेड झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, सामान्य मृत्यूप्रमाणेच हा मृत्यूच असतो, असंही ताविल यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.