मुंबई, 29 ऑगस्ट: बऱ्याचदा आपल्याला सकाळी उठल्यावर डोकेदुखी (Headache) जाणवते. त्यामुळे दिवसभर चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही आणि त्रास होतो. रात्री डोकं दुखत असेल तर ते 7-8 तासांच्या झोपेनंतर बरं होतं. पण कधीकधी सकाळी अचानक होणाऱ्या डोकेदुखीमुळे दिवस खराब जातो. क्वचित कधीतरी सकाळी होणारी डोकेदुखी नॉर्मल असते, पण जर कायमच तुम्हाला त्रास होत असेल तर ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे.
सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होण्याची अनेक कारणं असू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि तुम्हाला त्यापासून सुटका हवी असेल तर आधी त्या मागची कारणं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया सकाळी उठल्यावर डोकेदुखीची कारणं.
सकाळी होणाऱ्या डोकेदुखीमागची कारणं-
तज्ज्ञांच्या मते, सकाळी होणारी डोकेदुखी सामान्य आहे आणि त्यामागे अनेक कारणं असू शकतात. जर एखाद्याच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर त्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासोबतच जास्त दारू प्यायल्याने किंवा जास्त वेळ उन्हात राहिल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तणाव आणि इतर आजारांमुळे तुमची डोकेदुखी आणखी वाढू शकते. सकाळच्या डोकेदुखीची विशेष काळजी करण्याचं कारण नाही, ते केवळ डिहायड्रेशनमुळे होतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
लक्षणं काय आहेत?-
अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे डोकेदुखी होऊ शकते. उदाहरणार्थ, मायग्रेन असेल तर त्याचं दुखणं खूप जास्त असतं, असं म्हणतात. क्लस्टर डोकेदुखीमध्ये डोळ्यांच्या चहुबाजुंना खूप दुखतं, तसंच डोकंही दुखतं. या शिवाय, सायनस डोकेदुखी सहसा संसर्गामुळे होते. त्यात नाक, डोळे किंवा कपाळाभोवती खूप वेदना होतात. ही डोकेदुखीची लक्षणं (Headache Symptoms) आहेत.
कोणत्या प्रकारची डोकेदुखी होते?-
एकूणच डोकेदुखीचे सुमारे 300 प्रकार (Types of Headache) आहेत, म्हणजे माणसाचं वेगवेगळ्या 300 कारणांमुळे डोकं दुखू शकतं. सकाळची डोकेदुखी साधारणपणे पहाटे 4 ते 9 च्या दरम्यान सुरू होते आणि त्याचा त्रास झालेल्या व्यक्तीला झोप येत नाही. ही क्लस्टर डोकेदुखी (Cluster headache) किंवा अगदी मायग्रेन (Migraine) देखील असू शकतं ज्या लोकांना सकाळी डोकेदुखी होते त्यांना झोपेसंबंधित आजार होतात, असं संशोधनात आढळून आलंय.
डोकेदुखी का होते?-
सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होण्यामागची कारणं अनेक असू शकतात. त्यापैकी काही कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत-
शिफ्टमध्ये काम केल्यामुळे सकाळी होणारी डोकेदुखी ही सर्केडियन रिदम डिसऑर्डरमुळेही (Circadian Rhythm Disorder) होऊ शकते, असं संशोधनात आढळून आलं आहे. सामान्यपणे शरीराचं नैसर्गिक ‘बॉडी क्लॉक’ बंद झाल्यानंतर असं होतं. जसं की, ऑफिसच्या शिफ्ट बदलणं, ज्यामुळे लोक झोपायच्या वेळी जागे असतात आणि जागं राहण्याच्या वेळेत झोपतात. कारण जेव्हा तुम्ही नैसर्गिक घड्याळाच्या विरुद्ध वेळेत झोपता तेव्हा तुम्हाला नीट झोप येत नाही आणि जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्हाला डोकेदुखी होते.
स्लीप अॅपनिया-
सकाळची डोकेदुखी हा स्लीप अॅपनियाच्या (Sleep apnea) स्थितीचे एक प्रमुख संकेत आहे. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते, किंवा त्यांना ते कळत नाही. स्लीप अॅपनिया ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये श्वसननलिका दबल्या जातात आणि रात्रीच्या वेळी श्वास घेणं तात्पुरतं थांबतं. यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखी आणि थकवा तर येतोच, शिवाय रात्री घोरण्याची समस्यादेखील होते.
झोपेशी संबंधित विकार-
एखाद्याला झोपेशी संबंधित विकार (Sleep Disorders) असला तरीही, सकाळी उठल्यावर डोकेदुखी होऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूचा जो भाग झोप कंट्रोल करतो, तोच भाग वेदनाही कंट्रोल करतो, त्यामुळे आता जर त्याच भागात गडबड झाली असेल तर सकाळी डोकेदुखी होणार हे मात्र नक्की. नार्कोलेप्सी, झोपेत चालणं, योग्य उशी न घेणं आणि झोपेच्या वेळेत अचानक झालेले बदल यामुळे जास्त झोप येणं, झोप न येणं किंवा डोकेदुखी होणं, अशा समस्या होऊ शकतात.
मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या-
डिप्रेशन आणि शीण (Depression and anxiety) हीदेखील सकाळच्या डोकेदुखीची प्रमुख कारणं आहेत. कारण ते त्रास निद्रानाशाशी संबंधित आहेत. याशिवाय अॅस्प्रिन असलेली औषधं, वेदनांची औषधं आणि कॅफिन डोकेदुखी आणि मायग्रेनला कारणीभूत ठरतात. दारूमुळेही डोकेदुखी होते. डोकेदुखी सामान्यतः पाणी प्यायल्याने, वेदना कमी करणारी औषधं घेतल्याने आणि झोपेने कमी होते, परंतु काही वेळा डोकेदुखी हे अधिक गंभीर आरोग्य स्थितीचं लक्षण असू शकतं. त्यामुळे तुम्हाला दररोज डोकेदुखी होत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणं आणि त्यांचा सल्ला घेणं श्रेयस्कर ठरेल.