मुंबई, 27 जानेवारी : ड्रायफ्रूट्स अर्थात सुका मेवा पौष्टिक असतो. त्यापैकी काजू, बदाम, पिस्ता अनेक जण आवडीनं खातात; मात्र खारीक, बेदाणे, मनुका, अक्रोड, जर्दाळू हा मेवा फारसा खाल्ला जात नाही. वास्तविक सुक्या मेव्यातला प्रत्येक पदार्थ पोषणमूल्यांनी भरलेला आहे; मात्र अक्रोडलाच सुपरफूड असं म्हटलं जातं. कारण त्यामध्ये जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर्स असे अनेक पौष्टिक घटक आहेत. अक्रोड पौष्टिक असतात; पण ते कच्चे खावेत की भिजवून खावेत, याबाबत अनेकांमध्ये मतभेद आहेत. त्याबद्दल अधिक माहिती घेऊ या.
अक्रोडमध्ये कर्बोदकं, प्रथिनं, उपयुक्त चरबी, फायबर्स, जीवनसत्त्वं, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम असे पोषक घटक असतात. दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात; मात्र अक्रोड नुसते खाणं चांगलं की भिजवून खाणं चांगलं याबद्दल अनेकांना माहिती नसते.
मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसणारे अक्रोड खरोखरच मेंदूसाठी उत्तम समजले जातात. हे अक्रोड नुसतेही खाल्ले तरी चालतात किंवा भिजवून खाल्ले तरी चालतात; मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ते भिजवून खाणं केव्हाही चांगलं. भिजलेल्या अक्रोडांचं पचन करणं पोटाला सोपं जातं. अक्रोडमध्ये सायटिक अॅसिड असतं. अक्रोड भिजवल्यानं ते कमी होतं.
हेही वाचा : शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक; संशोधनात समोर आले भयंकर दुष्परिणाम
अक्रोड जरी पौष्टिक असले, तरी आतडी अशक्त असलेल्यांना ते पचवणं अवघड असतं. त्यामुळेच ते भिजवून खाल्ले तर ते पचायला हलके होतात. अक्रोड उष्ण असल्यानं भिजवल्यानंतर त्यातली उष्णता थोडी कमी होते. रात्रभर भिजवून सकाळी पाणी प्यायल्यानंतर 2-3 अक्रोड खावेत. दिवसभरातही अधे-मधे अक्रोड खाता येऊ शकतात.
अक्रोड खाण्याचे फायदे
भिजवलेल्या अक्रोडमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. शरीरातलं वाईट कोलेस्टेरॉलही अक्रोडच्या सेवनानं कमी होतं. शरीरावर सूज येत असेल, तर आहारात अक्रोडचा समावेश करा. यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होईल.
अक्रोडमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीफेनॉल्स आणि ई जीवनसत्त्व भरपूर असतं. यामुळे मेंदूचं कार्य चांगलं राहतं. या घटकांमुळे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. अक्रोड खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती सुधारते.
टाइप 2 डायबेटीसवरही अक्रोड गुणकारी असतात. नियमितपणे अक्रोडांचं सेवन केल्यास डायबेटीस नियंत्रणात राहू शकतो. अक्रोडमध्ये फायबर्स असतात. यामुळे रक्तातली साखर कमी होण्यास मदत होते. अक्रोड नुसतेही खाता येतात. त्याचप्रमाणे खीर, लाडू यातही घालून खाता येऊ शकतात. त्यातून मिळणारे फायदे पाहता, नियमितपणे सेवन करणं हिताचं ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips