मुंबई, 22 सप्टेंबर: आता तुम्ही ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून प्रिस्क्रिप्शन असलेली औषधंदेखील मागवू शकता. फ्लिपकार्टनं मंगळवारी जाहीर केलं की हेल्थ प्लस सेवेद्वारे देशात कोठूनही औषधे मागवली जाऊ शकतात. यासाठी कंपनीनं आपलं अॅप युजर फ्रेंडली बनवलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हेल्थ प्लस सेवेवर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अपलोड करून औषधे मागवली जाऊ शकतात. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, त्यांच्या हेल्थ प्लस सेवेवर ग्राहकांना औषधे तसेच अनेक प्रकारची आरोग्य सेवा उत्पादनं मिळतील. फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी फॅशनपासून ते किराणा मालापर्यंत विविध उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीनं काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन फार्मसी ‘सस्तासुंदर’ विकत घेतली आहे, त्यानंतर कंपनीनं हेल्थ प्लस सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हेल्थ प्लस सेवेद्वारे देशातील लोकांना कमी किमतीत औषधं आणि आरोग्य सेवा उत्पादनं उपलब्ध करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट IBEF च्या अहवालानुसार, अलीकडच्या काही दिवसांत जागतिक स्तरावर ई-फार्मसी व्यवसायात 40-45 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा: 66 वर्षांच्या आजीबाईंनी केला नको तो प्रताप; पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम फ्लिपकार्ट हेल्थ प्लसचे सीईओ प्रशांत झवेरी म्हणाले की, “लवकरच फ्लिपकार्ट हेल्थ प्लस आणि फ्लिपकार्ट अॅपद्वारे लाखो भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत औषधं उपलब्ध करून देणार आहेत, कंपनीच्या संपूर्ण भारतभरातील सप्लाय सिस्टमचा ग्राहकांना फायदा होईल आणि त्यांच्याकडून ऑर्डर देण्यात येईल. औषधं आणि आरोग्य सेवा उत्पादनं कमी वेळेत मिळू शकतील. यासोबतच देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य उत्पादनांचा पुरवठा सुलभ होईल. फ्लिपकार्टचं जाळं देशभरात पसरलं आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवरून ऑनलाईन औषध विक्री सुरु झाल्यामुळं लोकांना औषधं घेण्यासाठी मेडिकलमध्ये जाण्याची गरज नाही. लोक आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या या औषधांची ऑर्डर करू शकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.