नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : जिथे कुठे स्वादिष्ट पदार्थ मिळत असतील, तिथे खवय्यांची रांग लागत असते. त्यातही पनीरयुक्त पदार्थ म्हटलं, की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हल्ली तर प्रत्येक चविष्ट, चमचमीत (Spicy Food) पदार्थात पनीर आणि चीझ यांपैकी कशाचा तरी वापर हमखास केला जातो. पनीर हा दुग्धजन्य पदार्थ असल्याने तो खाल्ल्यास झटकन पोटही भरतं. बराच वेळ भूक लागत नाही. कुठलाही दुग्धजन्य पदार्थ शरीरासाठी पोषकच ठरतो. पनीर खाणंही हे शरीरासाठी उपयुक्तच आहे. काहींना नुसतं पनीर खायलादेखील आवडतं. वजन वाढवण्यासाठी डॉक्टरही पनीर खाण्याचा सल्ला देतात; पण पनीर खाणं काही जणांसाठी हानिकारकही ठरू शकतं. पनीर खाणं का आणि कोणासाठी हानिकारक ठरू शकतं, याबद्दल जाणून घेऊ या. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘इंडिया डॉट कॉम’ने दिलं आहे.
दगदगीच्या जीवनशैलीत अनेक जण शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, कमी वयात विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. अलीकडे व्हेगन व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खाणं अनेकजण टाळतात. तरीही, पनीर खाणारे अनेकजण आढळतील. याच पनीरचं सेवन अति प्रमाणात झाल्यास शरीराला हानिकारक ठरतं. अनहायजिनिक ठिकाणी तयार होणारं पनीर आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतात. त्याशिवाय, पनीर चांगलं असलं तरी काही जणांना ते हानिकारक ठरू शकतं.
हेही वाचा - भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही; पाहा संशोधनातून काय समोर आलं
1. ज्या व्यक्तींना पोटाच्या समस्या आहेत, त्यांना पनीर पचत नाही. बद्धकोष्ठता (Constipation) आणि अॅसिडिटी (Acidity) असणार्या व्यक्तींनी पनीर खाणं टाळावं. तसंच ज्यांना पचनसंस्थेशी निगडित समस्या आहेत, त्यांनी आपल्या डाएटमध्ये पनीरचा समावेश करू नये.
2. ज्यांना कुठेही खाणं खाल्ल्यास फूड पॉयझनिंगचा त्रास होत असेल, तर त्यांनी पनीर खाऊ नये. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स असतात. त्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या गंभीर बनू शकते.
3. अति प्रमाणात पनीर खाण्यामुळे नॉशिया, डोकेदुखी किंवा भूक कमी होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
4. अति प्रमाणात पनीर खाण्याने डोकेदुखी आणि मायग्रेनला आमंत्रण मिळू शकतं.
5. गरोदर महिलांनी पनीर खाण्यापूर्वी (Avoid Paneer during Pregnancy) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ते पचायला जड असल्याने प्रत्येक महिलेला तिच्या प्रकृतीनुसार पनीर खाण्याबद्दल योग्य सल्ला डॉक्टर देऊ शकतात.
6. ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी पनीर खाणं टाळावं. अशा व्यक्तींनी पनीरचं सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते.
पनीर हा अनेकांसाठी आवडता खाद्यपदार्थ असतो; पण कोणत्याही पदार्थाचं अति सेवन किंवा आपल्या प्रकृतीचा विचार न करता केलेलं सेवन घातकच ठरतं. म्हणूनच तुम्ही कोणत्या शारीरिक समस्येवर उपचार घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट ठरवा आणि त्याचं पालन करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.