मुंबई, 26 डिसेंबर : कोरोना व्हायरस संक्रमणाच्या दोन जीवघेण्या लाटा बघितल्यानंतर आता हळूहळू जनजीवन सामान्य होण्याच्या मार्गावर होतं. कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, बाजारपेठा सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्या होत्या. मात्र, लगेचच कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये सध्या या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तेथील रुग्णालयांतील भयंकर स्थितीची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
युरोपातील अनेक देशांमध्येही पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ दिसू लागली आहे. याबाबत भारतामध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेकजण कुटुंबासह बाहेर पडण्याचा विचार करत आहे. पण, गेल्या काही दिवसांमधील देशातील कोरोना रुग्ण संख्येची आकडेवारी बघता, बाहेर पडण्याच्या योजना रद्द केल्या पाहिजेत, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पर्यटनस्थळी वाढला कोरोना
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) पोर्टलवर 16 ते 22 डिसेंबरदरम्यान नोंदवलेल्या डेटानुसार देशातील बहुतेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशातील राज्यं आणि प्रयोगशाळांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयसीएमआरनं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
शेवटी नको तेच झालं! चीनमधून परतलेला तरुण कोविड पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाची तयारी सुरू
रविवारी (25 डिसेंबर) दिल्ली विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय फ्लाइटच्या प्रवाशांची रँडम कोविड चाचणी सुरू होती. त्यापैकी काहींना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. भारतातील कोविड-19 चा सरासरी राष्ट्रीय दर सध्या 0.21 टक्के इतक्या सामान्य पातळीवर आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. पण, देशातील जवळपास तीन डझन जिल्ह्यांत एक टक्क्यांहून अधिक तर आठ जिल्ह्यांत पाच टक्क्यांहून अधिक रुग्ण दराची नोंद झाली आहे.
काय आहे आकडेवारी?
देशातील 684 जिल्ह्यांतील कोविड-19 संबंधित आकडेवारीनुसार, भारतातील आठ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक आहे. या मध्ये अरुणाचल प्रदेशातील लोहित (5.88 टक्के), मेघालयातील री भोई (9.9 टक्के), राजस्थानमधील करौली (5.71 टक्के) आणि गंगानगर (5.66 टक्के), तमिळनाडूमधील दिंडीगुल (9.80 टक्के), उत्तराखंडमधील नैनीताल (5.66 टक्के) यांचा समावेश आहे. यातील बहुतांश ठिकाणं ही पर्यटनस्थळं आहेत. या ठिकाणी लोक सहसा सुट्टीसाठी जातात.
चालताना, हसताना, गाताना अचानक कसे काय होताहेत मृत्यू? कोरोनाशी संबंध नाही ना? ICMR करतंय रिसर्च
हिमाचल प्रदेशातील कुल्लुमध्ये 14.29 टक्के आणि उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये 11.11 टक्के संसर्ग दर नोंदवला गेला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील दक्षिण-पूर्व जिल्ह्यात 1.13 टक्के आणि दक्षिण गोव्यात 1.10 टक्के संसर्ग दर आहे. उत्तराखंडमधील उत्तर काशीमध्ये 2.67 टक्के संसर्ग दर आहे. केरळमधील आठ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण एक टक्क्याहून अधिक आहे. पठानमथिट्टा (2.30 टक्के), कोट्टायम (2.16 टक्के), कोल्लम (1.97 टक्के), एर्नाकुलम (1.85 टक्के), इडुक्की (1.31 टक्के), कन्नूर (1.29 टक्के), तिरुवनंतपुरम (1.15 टक्के) आणि कोझिकोडमध्ये 1.4 टक्के संसर्ग दराची नोंद झाली आहे.
आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरमध्ये 4.04 टक्के, मंडीमध्ये 1.89 टक्के आणि शिमल्यात 1.50 टक्के कोविड-19 संसर्ग दर नोंदवला गेला आहे. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरामध्ये 3.30 टक्के, डोडामध्ये 1.64 टक्के आणि अनंतनागमध्ये 2.33 टक्के संसर्ग दर आहे. महाराष्ट्रातील अकोल्यात 1.63 टक्के, पुण्यात 1.15 टक्के, पंजाबमधील श्री मुख्तार साहिब येथे 1.15 टक्के, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये 2.48 टक्के संसर्ग दर नोंदवला गेला.
राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये करौली (5.71 टक्के), गंगानगर (5.66 टक्के), नागौर (4.88 टक्के), जयपूर (3.37 टक्के), भरतपूर (1.85 टक्के), चुरू (1.72 टक्के), झुंझुनू (1.59 टक्के) आणि आमेर (1.39 टक्के) यांची नोंद झाली आहे. कर्नाटकाची राजधानी बेंगळुरूच्या शहरी भागात संसर्गाचे प्रमाण 1.98 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus