मुंबई, 7 नोव्हेंबर: मेंदू शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीर यंत्रणेचं संपूर्ण नियंत्रण मेंदूकडे असतं. काही कारणांमुळे मेंदूला इजा झाली किंवा काही दोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर तसेच रोजच्या अॅक्टिव्हिटिजवर दिसून येतो. सर्वसामान्यपणे वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. शरीरात बदल होत असल्याचे संकेत आपल्याला अनेक गोष्टींमधून मिळतात. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांप्रमाणे आपल्या मेंदूचंदेखील वय वाढतं. काही विशिष्ट वयानंतर आपल्या मेंदूचा आकार हळूहळू कमी होत जातो. याचा परिणाम आपल्या अनेक गोष्टींवर होते. याची काही लक्षणं आपल्याला रोजच्या गोष्टींमध्ये दिसून येतात. एका विशिष्ट वयानंतर आपल्या मेंदूच्या आकारात बदल होतो. साधारणपणे वयाच्या 30 वर्षानंतर आपल्या मेंदूच्या आकारात बदल होऊ लागतो. वयाची साठी जशी जवळ येते तशी ही प्रक्रिया वेगात होते. आपल्या मेंदूचं आकारमान कमी झाल्याने ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती लक्षात न राहणं, लक्ष्य केंद्रीत न होणं आणि एकावेळी अनेक कामं करण्याची क्षमता कमी होणं यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वयाचा शरीरातील अन्य अवयवांच्या तुलनेत मेंदूवर जास्त परिणाम दिसून येतो. मेंदूत अनेक बदल होऊ लागतात. मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे काही संकेत आपल्याला दिसून येतात. वयापरत्वे मेंदूच्या आकारात बदल झाल्याने समस्या वाढू लागतात. हेही वाचा: Women In 40’s: चाळीशीत एकटेपणा जाणवतोय? मग महिलांनो नक्की जोपासा ‘हे’ छंद जसजसा मेंदू वयस्क किंवा वृद्ध होत जातो, तसा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. वाढत्या वयामुळे एन्झायटी आणि डिप्रेशनची समस्या जाणवणं हे सामान्य समजलं जातं. तसेच वयापरत्वे दृष्टीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वाढत्या वयानुसार व्यक्तीला दृष्टी दोष, दृष्टी कमी होणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचं वय साठीकडे जाऊ लागतं, तसा स्मरणशक्तीवर बदल दिसून येतो. ही गोष्ट खरंतर सामान्य असते. एखाद्यावेळी चावी विसरणं, पासवर्ड विसरणं, एखाद्या मित्राचं नाव लवकर न आठवणं यासारख्या समस्या वयापरत्त्वे दिसू लागतात. या समस्या वाढत्या वयामुळे निर्माण होत असलेल्या मेमरी लॉस अर्थात स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचे संकेत असतात.
मेंदूचा आकार कमी झाल्याने, फ्रंटल लोब आणि हिप्पोकॅम्पस शरीराच्या इतर भागांपेक्षा अधिक संकुचित होतात. संज्ञानात्मक कार्य योग्यरित्या होत नसल्याने तुम्हाला गोष्टी समजून घेण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागतो. काही व्यक्तीमध्ये त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होण्यापूर्वी एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेता न येणं, मनात गोंधळ निर्माण होणं असे संकेत दिसू लागतात. जसजसा तुमचा मेंदू वयस्क होत जातो, तसा त्याच्या कार्यपद्धतीतही बदल दिसून येतो. यामुळे तुमच्या भावनिक क्रिया-प्रतिक्रियांवरही परिणाम दिसून येतो. वयापरत्त्वे वारंवार मूड बदलण्याच्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.