पणजी, 10 फेब्रुवारी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (goa election 2022) प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी भाजपने (bjp) प्रतिष्ठापणा लावली आहे. काँग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण राज्यात यंदाही आयाराम गयारामच सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे गोवेकर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आणतात यापेक्षा निवडून आल्यावर कोण कोणत्या पक्षात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सर्वच उमेदावारांनी यावेळेस पक्षांतरांचा कळस गाठला आहे. कारण यंदा जवळपास 63 उमेदवारांनी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. गोवाच्या निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी संपुर्ण ताकद लावतायेत याकरता स्टार प्रचारक ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोव्यात आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. आपल्यालाच बहुमत मिळेल असा विश्वास सर्वच पक्षांना आहे. मात्र गोव्याचा आजवरचा इतिहास पाहिला तर नेहमीच गोव्यात पक्षांतर करुन सत्ता स्थापन करण्यात आली आणि ते यंदाही चुकणार नाही. कारण, गोव्याच्या राजकीय इतिहासांत या निवडणूकीत सर्वात जास्त म्हणजे तब्बल ६३ उमेदवारींनी उड्या मारत पक्षांतर करुन उमेदवारी मिळवली आहे. मग भाजप, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आप, राष्ट्रवादी असे सगळेच आणिपक्षांतर करणारेही साधेसुधे नव्हेत, आमदारे, मंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसचे रवी नाईक, भाजपाचे लक्ष्मीकांत पार्सेकर, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमांव अशा माजी मुख्यमंत्र्यांनीही या पराक्रमात आपली वर्णी लावली आहे. गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर व जयेश साळगावकर, भाजपाचे मायकल लोबो, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, दीपक पाऊसकर व एलिना साल्ढाणा हे माजी मंत्री आणि उपसभापती इजिदोर फर्नाडिस, कॉँग्रेसचे मिकी पाशेको, अपक्ष मंत्री असलेले रोहन खंवटे व गोविद गावडे, आजी-माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरिन्स, प्रसाद गावकर, आत्मेदा, प्रवीण झांट्ये, विल्येंड डिसा, किरण कांदोळकर, लव्ह मामलेदार, बेंजामीन सिल्वा व व्हिक्टर् गोन्साल्वीस या सगळ्यांनीच पक्षांतर केला आहे. आता कोणत्या पक्षांतून सर्वात जास्त पक्षांतरे झाली? हा एक चर्चेचा विषय झाला आहे. कोणत्या पक्षांतून सर्वात जास्त पक्षांतरे झाली? - भाजप - २२ - काँग्रेस - २१ - तृणमूल काँग्रेस १७ - गोवा फॉरवर्ड - ५ - अपक्ष आमदार ३ - राष्ट्रवादी काँग्रेस - २ आता पक्षांतर करुन कोणत्या पक्षात किती जण आले? तृणमूल क्राॅंग्रेस पक्षात १७ जणांनी प्रवेश केला आहे तर काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे ८ आणि भाजपात ७ जणांनी प्रवेश केला आहे. आपमध्ये ५ जणांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमध्ये ४ जणांनी प्रवेश केला आहे. तर मगो या पक्षात ३ जणांनी प्रवेश केला आहे. तर, कोणताही पर्याय नाही म्हणुन १७ जणांनी पक्षांतर करुन शेवटी अपक्ष निवडणूक लढवायची हे निश्चित केले. काही महाभाग असेही आहेत ज्यांनी काही तासांच्या अंतराने उमेदवारी मिळवण्याकरता चक्क दोन ते तीन वेळा पक्षांतर केले आहे. - कळंगूट मतदार संघाचे जोसेफ सिक्वेरा यांनी न काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काही तासातच भाजपाचे कमळ हातात घेतले - लवू मामलेदार मगो पक्षातून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण काही तरी बिघडलं आणि त्यांनी काही तासातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला - मोरेन लिबेरो काँग्रेसमधून भाजपात गेले आणि पुन्हा यू-टर्न घेत पुन्हा काँग्रेसमध्ये आले - आलेक्स रेजिनाल्ड लॉरिन्स काँग्रेस ते तृणमूल काँग्रेस ते अपक्ष अशा उड्या मारल्या एवढंच नाही तर आप पक्ष आणि भाजपा पक्षाशीही बोलणी केली. गोव्यात एक विनोद सध्या खुप व्हायरल होतोय. या विनोदाची गोवेकर चर्चा करुन मजा घेत आहे. हा विनोद असा आहे की, काही गोवेकर आपापसात चर्चा करत असतात “पहिले व्होटिंग मशीनमधील उमेदवारासमोरचे बटण दाबले तर मतदान उमेदवारालाच जायचे, आताही मतदान करताना ज्या उमेदावारासमोरचे बटण दाबल्यावर ते मत त्याच उमेदवाराला जाईलही… पण तो उमेदवार निवडणून आल्यावर कोणत्या पक्षात जातोय हे देवच जाणे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.