Explainer: काय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड'? अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज

Explainer: काय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड'? अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज

लवकरच वन नेशन – वन हेल्थ कार्ड (What is One Nation One Health Card) ही संकल्पना राबवली जाणार आहे. जाणून घ्या संकल्पनेविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची आणि योजनेची माहिती.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: एखाद्या दीर्घकालीन आजारावर तुम्ही वैद्यकीय उपचार घेत असता, तेव्हा प्रत्येकवेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचारांसाठी डॉक्टरांकडे जाताना तुम्हाला रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स आदीची भली मोठी फाईल जवळ बाळगावी लागते. कारण या फाईलमध्ये मागील उपचारांविषयीची सर्व माहिती असते. ही माहिती आणि सध्याची आरोग्याची स्थिती याची सांगड घालून डॉक्टर तुमची आगामी उपचार पध्दती ठरवत असतात. दरम्यान, जर तुम्ही डॉक्टर बदलले किंवा अन्य विशेष तज्ज्ञांचा सल्ला घ्यायची गरज भासली तरी ही फाईल तुम्हाला सातत्यानं सोबत न्यावी लागते.

सध्याचा काळ हा डिजिटल काळ मानला जातो. अशा स्थितीत रुग्ण आणि आजाराची सर्व हिस्ट्री (Patient Case History) ऑनलाइन का होत नाही, असा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. येत्या काही कालावधीत तुमच्या या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात येणार आहे. देशात ज्या प्रमाणं वन नेशन – वन रेशन कार्ड, वन नेशन -वन टॅक्स असे उपक्रम राबवले जात आहेत, त्याच धर्तीवर आता वन नेशन – वन हेल्थ कार्ड (What is One Nation One Health Card) ही संकल्पना राबवली जाणार आहे. जाणून घ्या संकल्पनेविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची आणि योजनेची माहिती.

हे वाचा-Explainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं? वाचा सविस्तर

15 ऑगस्ट 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनला (National Digital Health Mission- NDHM) सुरुवात केली. सरकार या महिन्यात हे मिशन देशभरात लागू करण्याची शक्यता आहे. सध्या हे मिशन अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव, लडाख आणि लक्षव्दीपमध्ये पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवलं जात आहे. या मिशन अंतर्गत हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री अंतर्गत सर्व हॉस्पिटल आणि क्लिनिकल लॅब एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. या मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना एक युनिक आयडी (ID) देण्यात येणार आहे. यामुळं सर्व नागरिकांच्या आरोग्यविषयीचा एककेंद्री डाटाबेस तयार होणार आहे.

प्रत्येकवेळी आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडं जाताना तुम्हाला वैद्यकीय तपशील असेलल्या कागदपत्रांची फाइल सोबत घेऊन जावं लागतं, हे आता बंद होणार असून या फायलीचं डिजिटल स्वरूपात रूपांतर होणार आहे. म्हणजेच आधार कार्डप्रमाणे हेल्थ कार्ड तयार होणार असून, त्यात तुमचं आरोग्य आणि आजार आदींविषयीचा संपूर्ण तपशील असणार आहे. या हेल्थ कार्डसाठी 14 अंकी युनिक आयडी असेल. या आयडीवर तुमची आरोग्यविषयक माहिती असेल. ही सर्व माहिती सेंट्रल सर्व्हरला जोडली जाईल. हे कार्ड सेंट्रल सर्व्हरशी जोडलं असल्यानं देशभरातील कोणत्याही दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात तुम्ही उपचार घेण्यासाठी गेलात तर हे कार्ड दाखवल्यास डॉक्टरांना तुमच्या आरोग्याविषयीचा सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

हे वाचा-Explainer : नेमका कसा होणार कोरोना महासाथीचा अंत?

कशाप्रकारे सुरू कराल हेल्थ आयडी?

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू झाल्यावर https://healthid.ndhm.gov.in/ register या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा हेल्थ आयडी स्वतः तयार करू शकणार आहात. त्यासंबंधीची प्रक्रिया देखील सोपी आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. हेल्थ आयडी काढण्यासाठी सर्वप्रथम https://healthid.ndhm.gov.in/ register या वेबसाइटवर जावं. आधार कार्डशी संलग्न हेल्थ आयडी जनरेट करण्यासाठी `जनरेट व्हाया आधार कार्ड`वर क्लिक करावं. जर तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकाच्या मदतीनं हेल्थ आयडी काढायचा असेल तर त्यासाठी `जनरेट व्हाया मोबाईल `वर क्लिक करावं. आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकून एंटर करावं. त्यानंतर एक फॉर्म दिसेल, त्यात तुमची सर्व आरोग्यविषयक माहिती डॉक्युमेंटनुसार भरावी. ही माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा हेल्थ आयडी (Health ID) मिळेल.

तसंच तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट ऑफलाइन देण्याची गरज नाही कारण ही सर्व प्रक्रिया ऑनलाइनच होईल. विशेष म्हणजे लहान मुलांचं हेल्थ आयडी कार्ड काढण्यासाठी देखील हिच प्रक्रिया असेल. तसेच हे कार्ड काढायचं किंवा नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल. कारण प्रत्येकानं हेल्थ कार्ड काढावं, असं सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेलं नाही.

त्याचप्रमाणं गुगल प्ले स्टोअरवर NDHM हेल्थ रेकॉर्ड अॅप उपलब्ध आहे. या माध्यमातूनही तुम्हाला हेल्थ आयडी काढता येणार आहे. या व्यतिरिक्त सरकारी, खाजगी दवाखाने, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवरही हेल्थ आयडी काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

आपोआप अपडेट होईल तुमची आरोग्यविषयक माहिती

पहिल्यांदा हेल्थ कार्ड काढताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची सर्व माहिती अपडेट करावी लागेल. कार्ड काढल्यानंतर सर्व रिपोर्ट्स आपोआप अपलोड होतील. तसेच उपचारांसाठी गेल्यावर हे कार्ड दाखवल्यास उपचारांची माहिती यात अपडेट होत राहील.

`एनडीएचएम`नं आपल्या वेबसाईटवर माहिती देताना स्पष्ट केलं आहे, की या हेल्थ कार्डसाठी जो डाटा तुम्ही देणार आहात, तो एन्क्रिप्शनसह सेंट्रल नेटवर्कवर स्टोअर केला जाणार आहे. यासाठी तुमची सहमतीही घेतली जाईल. तसेच जेव्हा एखाद्या डॉक्टरकडं तुम्ही उपचारांसाठी जाल, तेव्हा डॉक्टरांना थेट तुमची आरोग्यविषयक किंवा अन्य माहिती दिसणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी एंटर केल्यानंतरच डॉक्टर माहिती पाहू शकणार आहेत. डॉक्टर या कार्डावरील तुमचा आरोग्यविषयक डाटा कॉपी किंवा एडिट करू शकणार नाहीत.

हे वाचा-Long Covid: संसर्गातून बरं झाल्यावर लगेच जास्त व्यायामाला सुरुवात का नको?

डिजिटल फॉरमॅटमध्ये उपलब्ध होईल प्रिस्क्रिप्शन

या नव्या हेल्थ डिजिटल कार्डाचे अनेक फायदे आहेत. या कार्डावर तुमची आरोग्यविषयक संपूर्ण माहिती डिजिटल फॉरमॅटमध्ये असेल. त्यामुळं तुम्ही दवाखान्यात उपचारांसाठी गेला तर तिथं तुमची आरोग्यविषयक सर्व जुनी माहिती, रिपोर्टस, प्रिस्क्रिप्शन्स डिजिटल फॉरमॅटमध्ये उपलब्ध होईल. तुम्हाला कोणते आजार आहेत, तुम्ही या पूर्वी घेतलेले उपचार, कोणत्या औषधांची तुम्हाला अलर्जी आहे, याबाबतची सर्व माहिती डॉक्टरांना अगदी एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळं डॉक्टरांना तुमच्या सद्यस्थितीतील आरोग्य विषयक समस्येवर उपचार करणं सोपं जाईल. रेकॉर्डसवरून तुमच्या आरोग्याविषयीच्या अनेक नव्या गोष्टी डॉक्टरांना सहजपणे समजू शकतील आणि त्यामुळं नव्या तपासण्यांवर होणारा खर्च आणि वेळ वाचेल.

`वन नेशन – वन हेल्थ कार्ड` ही एक उत्तम संकल्पना असून, यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यविषयक डाटा डिजिटल होणार असून, तो देशभरात कुठेही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच होईल.-

First published: September 18, 2021, 4:39 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या