मॉस्को, 12 एप्रिल : रशिया युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) 50 दिवस पूर्ण होत आहेत. 40 दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर रशियाने आपली रणनीती बदलण्याची (Strategy Change of Russia) घोषणा केली. त्यांनी आपले लक्ष उत्तरेऐवजी पूर्वेकडे वळवलं आहे. यामुळे रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) येथून माघार घेतली आहे. रशियाची रणनीती फेल गेली म्हणून त्यांना हे पाऊल उचलावे लागले की त्यांना युक्रेनला जिंकण्याचा चांगला मार्ग शोधला आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य तज्ज्ञ रशियाला रोखण्यात युक्रेन यशस्वी झाल्याचे सांगत आहेत.
कीव सोडण्याचा निर्णय
हे युद्ध लांबणार असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. यादरम्यान युक्रेनच्या सैन्याने रशियन सैन्याचा जोरदार मुकाबला केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रशियाला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याची रणनीती बदलावी लागली. आता रशिया प्लॅन बी वर काम करत आहे, ज्यामुळे तो उत्तरेपेक्षा पूर्वेकडे जास्त जोर देत आहे.
रशियाने असा निर्णय का घेतला?
रशियाने हे पाऊल का उचलले याबाबत पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की रशिया डॉनबासमधील पुरवठा सुधारून तेथे स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रारंभिक चिन्हे दर्शवित आहेत. NPR अहवालानुसार, Donbass मध्ये आधीच लढाई सुरू आहे आणि रशियाने कोणतेही नवीन ऑपरेशन सुरू केलेले नाही.
Russia Ukraine War: रशियाने मारियुपोलवर केमिकल वेपन्सचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा; युद्धाला आणखी गंभीर वळण?
युक्रेनची कामगिरी
युक्रेनसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे रशियन सैन्य युक्रेनवासीयांचे मनोधैर्य तोडण्यात अपयशी ठरले आहे. लोक त्यांच्या देशाचे रक्षण करण्यासाठी प्रेरित आहेत. याशिवाय युक्रेनियन लोक त्यांच्याच देशात असल्याने त्यांना याचा फायदा मिळत आहे. तर रशियन लोकांना अन्न, इंधन आणि इतर गरजा या सर्व गोष्टी सोबत आणाव्या लागतात. याशिवाय, जिथे रशियन सैनिकांना थंडीत बाहेर राहण्यास भाग पाडले जाते, तिथे युक्रेनियन लोक त्यांच्या घरात आहेत.
रशियाला काय मिळेल?
त्याच वेळी रशियाला आपल्या सीमेजवळ जाऊन भक्कम होण्याची संधी मिळू शकते. त्यांची पुरवठा व्यवस्था चांगली होईल आणि ते स्वतःची पुनर्रचना करू शकतील. अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे कोरी शेक, म्हणतात, की युक्रेनियन लोकांना अजूनही फायदा होईल. त्यांना त्यांच्या शहरांतील प्रत्येक रस्त्याची माहिती आहे. रशियन लोकांना परदेशी असण्याचा तोटा आहे.
आणखी एक गोष्ट
या युद्धातील एक मोठी वस्तुस्थिती अशी आहे की रशियाने अद्याप एकही शहर ताब्यात घेतलेले नाही. रशियन शहरांच्या बाहेरून लढत आहेत. पहिल्या टप्प्यातही ते बराच काळ कीवपासून फक्त 10 मैल दूर होते. कीवमधून माघार घेतल्यास, रशियन सैन्य बेलारूसी सीमेवर उत्तरेकडे जात आहे, ज्यामुळे त्यांना पुरवठा आणि इतर मदत मिळेल आणि ते पूर्व युक्रेनकडे देखील वळू शकतील. यामध्ये युक्रेनला आपल्या देशाच्या आतील भागात पोहोचण्याचा फायदा मिळेल, तर रशियन लोकांना खूप प्रवास करावा लागेल.
एक फायदेशीर बदल
हल्ल्याच्या सुरुवातीपासून रशियाकडे ईशान्य आणि दक्षिणेला एकही कमांडर नव्हता. पाश्चिमात्य देशांचे म्हणणे आहे की आता रशियाने जनरल अलेक्झांडर ड्वोर्निकोव्ह यांच्याकडे संपूर्ण कमांड दिली आहे. तो मारियुपोलसह दक्षिणेकडील प्रदेशातील युद्ध पाहत होता. ड्वोर्निकोव्ह हे यापूर्वी सीरियन युद्धात रशियन सैन्याचे कमांडर होते. याचा मोठा फायदा रशियाला मिळणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
नवीन टप्प्यात आणखी गोळीबार आणि बॉम्बस्फोट दिसू शकतात. युक्रेनला पहिल्या टप्प्यात यश मिळताना दिसत होते, जिथे ते अमेरिकेकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करत होते. युक्रेनला अजूनही ते मागणी करत असलेल्या मोठ्या शस्त्रांची गरज आहे. सध्या युद्धात कोण जास्त काळ टिकतो हे जास्त महत्वाचे झाले आहे. अशा स्थितीत कीवमधून माघार घेणेही रशियासाठी चांगले ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.